नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील चौघा दोषींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. हे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी हरिनगरच्या पंडीत दिनदयाल उपाध्याय रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तुरुंगातील नियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही एक प्रक्रिया असते. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाशी दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह घरच्या मंडळींकडे अंतिम संस्कारासाठी देण्यात येतील. जर कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी आले नाही तर चारही गुन्हेगारांच्या मृतदेहावर कारागृहातच अंत्यसंस्कार करण्यात येतील. ज्या जेल क्रमांक ३ मध्ये ही फाशी देण्यात आली त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.



कपडे आणि सामान कुटुंबियांना सोपणार


फासावर लटकवण्याआधी चार ही आरोपींना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली. पण चौघांनी ही कोणतीच इच्छा जाहीर केली नाही. त्यामुळे तिहाड कारागृह प्रशासन दोषींनी कमवलेले पैसे त्यांच्या कुटुंबियांना देणार आहे. सोबतच त्यांचं सामान आणि कपडे देखील कुटुंबियांना सोपणार आहेत.


तिहाड जेल प्रशासनाने आज पहाटे निर्भयाच्या चारही आरोपींना फासावर लटकवलं. विनय, अक्षय, मुकेश आणि पवन गुप्ता अशी या दोषींची नावे आहेत. चार ही गुन्हेगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहेत.


७ वर्षानंतर निर्भयाला न्याय


१६ डिसेंबर २०१२ ला दिल्लीत संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली होती. बलात्कार करुन या दोषींनी निर्भयावर शारिरीक अत्याचार ही केले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. निर्भयाला न्याय मिळावा म्हणून लोकं हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरली. पण अखेर ७ वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला.