इंदोर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इंदोर येथील सैफी मशिदीला भेट दिली. अशरा मुबारकनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. मध्य प्रदेशातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी सैफी मशिदीला दिलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या भाषणात मोदींनी दाऊदी बोहरा समाजाचे कौतुक केले. या समाजाची राष्ट्रभक्ती सर्वांसाठी एक आदर्श आहे. देशातील शांतता आणि विविधता जपण्याच्यादृष्टीने दाऊदी समाजाचे योगदान अविभाज्य असल्याचे मोदींनी सांगितले. 


गुजरातमधल्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत बोहरा समुदायाशी माझे अत्यंत चांगले संबंध जुळले होते, अशी आठवणही मोदींनी यावेळी सांगितली. बोहरांचे धार्मिक प्रमुख सय्यदना मुफद्दल सैफुद्दिन यांची पंतप्रधानांनी भेट घेतली. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते.



येत्या काही महिन्यांत मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात. इंदूरमधील राजकारणावर बोहरा समाजाच्या मतदारांचा प्रभाव आहे. याशिवाय, उज्जैन आणि बुऱ्हाणपूरमध्येही या समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मोदींनी सैफी मशिदीला दिलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.