पाटणा : बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका साखरेच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुर्घटना घडली तेव्हा साखर कारखान्यात १००हून अधिक कामगार होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळगंज येथे सासामूसा साखर कारखाना आहे. बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास जोरदार स्फोट झाला आणि एकच कल्लोळ झाला. हा स्फोट बॉयलर फुटल्याने झाला. यावेळी तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर १२हून अधिक कामगारांची प्रकृती गंभीर आहे. 


रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर झालेले कामगार ९० टक्क्यांहून अधिक भाजले गेलेत. स्थानिक प्रशासनाकडून साखर कारखाना रिकामा करुन तपास सुरु केलाय. कारखान्यात काम करणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयलरच्या तपासणीशिवायच तो चालू करण्यात आल्याने ही दुर्घटना घडली. 


अर्जुनकुशवाहा, कृपा यादव आणि शमसुद्दीन ही मृतांची नावे आहेत. तर मोहम्मद हरुल, पारसनाथ प्रसाद, बिकरमा यादव, रविन्द्र यादव, मो. हसमुद्दीन, चंद्रदेव प्रसाद, कन्हया प्रसाद अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. 



 


याआधी नोव्हेंबरमध्ये रायबरेलीच्या एनटीपीसीमध्ये बॉयलर फुटल्याने १८ जणांचा मृत्यू झाला होता. तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते.