जय श्रीराम आणि मॉब लिंचिंग विरुद्ध ४९ सेलिब्रिटींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
पत्रात वाढत्या असहिष्णूतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
मुंबई : जय श्रीरामवरून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्रात वाढत्या असहिष्णूतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम, बॉलिवुडमधील आघाडीचा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह अनेकांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. दलीत, मुस्लीम समाजातील नागरिकांवर जमावानं हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांची संख्या वाढत आहे.
अनेक ठिकाणी गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीवरुन कलाकार, लेखकांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकरणांमध्ये कारवाई होते का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. जय श्रीरामच्या घोषणा देण्यासाठी लोकांना बळजबळी केली जाते आहे. हे चुकीचं असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तर जय श्रीराम म्हणण्यावरुन राजकारण सुरु आहे.
या पत्रात सेलिब्रिटींनी म्हटलंय की, 'फक्त संसदेत मॉब लिंचिंगच्या घटनेची निंदा करुन नाही चालणार. यावर काय कारवाई करण्यात येत आहे ते देखील सांगावं. या प्रकरणात जामीन दिला जावू नये आणि कडक शिक्षा देण्यात यावी. या प्रकरणात हत्या करणाऱ्या लोकांवर आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात यावी.'