पश्चिम बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी मोठा बॉम्बस्फोट; दोघांचा मृत्यू
Bengal Violence : तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी स्फोट हा स्फोट झालाय. टीमसी नेत्याच्या सभेआधीच हा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे
West Bengal Blast : पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. मिदनापूर जिल्ह्यातील भूपतीनगर येथील तृणमूल कॉंग्रेसने नेते राजकुमार यांच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या जाहीर सभेआधीच हा स्फोट झाल्यानमुळे खळबळ उडाली आहे.
बॉम्बस्फोटात मृत्यू झालेले हे तृणमूलचे कार्यकर्ते होते अशी माहिती समोर आली आहे. नेरिबिला गावात तृणमूलच्या बूथ अध्यक्षांच्या घरी शुक्रवारी रात्री 11.15 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली. स्फोटामुळे घराचेही मोठे नुकसान झाले आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की, घराचे छप्पर उडून गेले.
भाजपचा आरोप
तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घरी बॉम्ब तयार केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यात बॉम्ब बनवण्याचा उद्योग फोफावत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. तर सीपीआय (एम)चे ज्येष्ठ नेते सुजन चक्रवर्ती यांनी याप्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे, टीएमसीचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले की, विरोधक कोणत्याही पुराव्याशिवाय सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत.