कडकनाथ कोंबडा कोणाचा? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात वाद
एकमेकांचे शेजारी असलेल्या दोन्ही राज्यांनी काळ्या रंगाचे पंख असलेल्या या कोंबड्याचा `जीआय टॅग` मिळविण्यासाठी चेन्नईतील भोगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयात निवेदन दिले आहे.
भोपाळ : मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या दोन राज्यामध्ये सध्या भलत्याच कारणावरून वाद निर्माण झाला आहे. कोंबड्याची एक प्रजात असलेला कडकनाथ हा कोंबडा कोणाचा यावरून हा वाद सुरू आहे. ईआय टॅग (भौगोलिक संकेतांक) टॅगसाठी दोन्ही राज्यांनी कडकनाथवर दावा सांगितला आहे. एकमेकांचे शेजारी असलेल्या दोन्ही राज्यांनी काळ्या रंगाचे पंख असलेल्या या कोंबड्याचा 'जीआय टॅग' मिळविण्यासाठी चेन्नईतील भोगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयात निवेदन दिले आहे.
पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यातही रंगला होता वाद
दरम्यान, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांमध्येही अशाच प्रकारचा वाद रंगला होता. या दोन राज्यांमध्ये रसगुल्ल्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादात पश्चिम बंगालने बाजी मारली होती. दरम्यान, असाच वाद आता छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात रंगला आहे. या वादात कोण बाजी मारणार याबाबत देशभरातील कडकनाथच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
काय आहे वाद?
मध्यप्रदेशचा दावा असा की, कडकनाथ कोंबड्याची उत्पत्ती मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात झाली. तर, छत्तीसगढचे म्हणने असे की, कडकनाथचे छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने पालनपोषण केले जाते. या ठिकाणी त्याचे संरक्षण आणि नैसर्गिक प्रजननही केले जाते.
कडकनाथचे वैशिष्ट्य
अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, कडकनाथ कोंबड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. त्यामुळे इतर कोंबड्यांच्या तुलनेत त्यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. तसेच, बाजारातही या कोंबड्याला इतर कोंबड्यांपेक्षा अधिक भाव मिळतो.