नवी दिल्ली : सध्या देशात लग्न सराई सुरू आहे. लग्न समारंभातील अनेक असे किस्सेसमोर येत आहेत, ज्यामधील काही गोष्टींवर कोणाचा विश्वास देखील बसणार नाही. मध्यप्रदेशातील भिंड शहरात लग्नाच्या नावावर फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. गोरमी परिसरात राहणाऱ्या मुलाने दोन लोकांना लग्नासाठी वधू शोधण्यास सांगितले होते. मुलाने त्या दोन इसमांना लग्नासाठी 90 हजार रूपये देखील दिले, पण लग्नाच्या रात्री नववधू पळून गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमची सहयोगी वेबसाईट इंडिया डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार सोनू जैनला लग्नासाठी मुलगी भेटत नव्हती, तेव्हा त्याने ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या त्याच्या ओळखीच्या उदल खाटिकला या संबंधी सांगितलं. तेव्हा उदल म्हणाला, 'मी तुझ लग्न करून देईल पण त्यासाठी मला 1 लाख रूपये द्यावे लागतील.'


त्यानंतर 90 हजार रूपयांमध्ये हा करार झाला. त्यानंतर उदल एका महिलेला घेवून गोरमीमध्ये आला. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सोनू जैनचे लग्न त्या महिलेशी झाले. लग्नानंतर सोनूच्या कुटुंबाने वधूला आशीर्वाद दिला आणि मग सगळे झोपायला गेले.


दरम्यान, वधूने अस्वस्थ असल्याचे नाटक केले आणि थोडा वेळ गच्चीवर जाते असं सांगितलं. तेव्हा एकाच्या लक्षात आलं की नवरी गच्चीवर नव्हती. त्यानंतर नववधूला शोधण्यासाठी पळापळ सुरू झाली. पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली. पोलिसांनी 5 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.