Telangana MP Stabbed Video : नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) पार पडणार आहेत. त्यामुळे आता देशभरात निवडणुकीचं वातावरण तयार झाल्याचं पहायला मिळतंय. तेलंगाणामध्ये (Telangana Elections) सर्वच पक्ष जोरदार तयारीत लागले आहेत. काँग्रेसने नुकतीच आपली दुसरी यादी जाहीर केली होती. अशातच आता तेलंगाणामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) खासदार कोथा प्रभाकर रेड्डी (MP Kotha Prabhakar Reddy) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आलीये. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान ही घटना घडली. आरोपीने त्यांच्या पोटात चाकू खुपसल्याने खासदार गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना सिकंदराबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच आत्ताची भारत राष्ट्र समितीचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांना यंदा विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आलं होतं. निवडणूक प्रचारासाठी ते सिद्धीपेटमधील सूरमपल्ली गावात पोहोचले. नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं. वाजत गाजत प्रचार सुरू असताना एक अनोळखी व्यक्ती रेड्डी यांच्याजवळ आली. त्यावेळी रेड्डी यांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. पण आरोपीने त्याचवेळी संधी साधून खासदाराच्या पोटात चाकू खुपसला.


पाहा Video



खासदारांच्या पोटात चाकू खुपसल्याने मोठा गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी खासदारांना सावरण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आरोपीला कार्यकर्त्यांना चोप दिला. त्यानंतर खासदार रेड्डी यांना सिकंदराबादमधील यशोदा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना हैदराबादच्या रुग्णालयात नेण्यात येईल, अशी माहिती देखील समोर येतीये. भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी रेड्डी यांच्याशी फोनवरून प्रकृतीची विचारणा देखील केली आहे.


आणखी वाचा - जरांगेंची तब्येत ढासळली अन् ग्रामस्थांना अश्रू अनावर, घोटभर पाणी घेतलं पण...


दरम्यान, बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून दोन्ही पक्षांत छुपा करार झाला आहे. या दोन्ही पक्षांना ज्यातून फायदा मिळेल तीच कामे करतात, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला होता. त्यामुळे आता काँग्रेस तेलंगाणामध्ये भाजप आणि बीआरएस यांच्याविरुद्ध लढत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली असून अनेक बड्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत बीआरएस, बीजेपी, टीडीपी या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या अनेक नेत्यांना तिकीट दिलंय.