भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला अटक
सीमा सुरक्षा दल, स्थानिक पोलिस आणि केंद्रिय गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) घुसखोरी करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील रण ऑफ कच्छच्या भारत-पाकिस्तान सीमेवरून ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाकडून कोणत्याही प्रकारचे संशयास्पद सामान जप्त करण्यात आले नाही. परंतु बीएसएफ आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकड़ून घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाचे वय ५० वर्षे आहे. बुधवारी भारत-पाकिस्तान सीमेवर असणाऱ्या बाउंड्री पिलर संख्या १०५० येथून भारतीय सीमेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. हा व्यक्ती आपल्या कामगिरीत यशस्वी होण्याआधीच सतर्क असलेले सीमा सुरक्षा दल तेथे हजर झाले. सीमा सुरक्षा दलाकडून घुसखोरी करणाऱ्या नागरिकाला आत्मसमर्पण करण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या पाकिस्तानी व्यक्तीने आत्मसमर्पण केले असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
घुसखोरी करणाऱ्या नागरिकाकडून कोणतेही सामान अथवा कागदपत्र मिळाले नाही. त्यामुळे त्याची ओळख अद्याप समजू शकलेली नाही. त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अटक करण्यात आलेला पाकिस्तानी नागरिक कोणत्या उद्देशाने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता याबाबत सीमा सुरक्षा दल, स्थानिक पोलिस आणि केंद्रिय गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी चौकशी करत आहेत.