नवी दिल्ली: भारत-बांगलादेश सीमारेषेवर बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेशकडून (बीजीबी) गैरसमजातून BSFच्या जवानाची हत्या झाल्याचे स्पष्टीकरण बांगलादेशचे गृहमंत्री असादुझ्झमन खान यांनी दिले आहे. गरज पडल्यास आपण भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेटून चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-बांगलादेश सीमेवर गुरुवारी बांगलादेशी सैन्याकडून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामध्ये हेड कॉन्स्टेबल विजयभान सिंह शहीद झाले होते. तर कॉन्स्टेबल राजवीर यादव हे जखमी झाले होते. भारत आणि बांगलादेशी अधिकाऱ्यांमधील फ्लॅग मिटींगच्यावेळी हा प्रकार घडला होता. 


भारतीय मच्छिमाराला सोडवण्यासाठी BSFच्या जवानांनी आमच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा बांगलादेशकडून करण्यात आला होता. आम्ही केवळ स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचेही बांगलादेशने म्हटले. मात्र, BSFने हा दावा फेटाळून लावताना आपल्या बाजूने कोणताही गोळीबार न झाल्याचे सांगितले. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. 


BSFने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी तीन भारतीय मच्छिमार येथील पद्मा नदीत मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी बांगलादेशी सैन्याने त्यांना पकडले. काहीवेळानंतर यापैकी दोन मच्छिमारांना सोडून देण्यात आले. हे दोन मच्छिमार काकमरिचार येथील भारतीय सैन्याच्या चौकीवर आले. आणखी एका मच्छिमाराला सोडण्यासाठी बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेशकडून (बीजीबी) BSFच्या जवानांना फ्लॅग मिटिंगसाठी पाचारण करण्यात आले. 


त्यानुसार, BSFचे पोस्ट कमांडर पाच जवानांसह बोटीत बसून पद्मा नदीतील बांगलादेशी सीमेनजीक गेले. यावेळी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये फ्लॅग मिटिंगही पार पडली. मात्र, बांगलादेशी सैन्याने भारतीय मच्छिमाराला सोडण्यास नकार दिला. तसेच बांगलादेशी सैन्याने BSFच्या जवानांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ही परिस्थिती पाहून BSFच्या जवानांनी बोटीतून पुन्हा माघारी जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बांगलादेशी सैन्याकडून BSFच्या जवानांवर गोळीबार करण्यात आला. यावेळी हेड कॉन्स्टेबल विजयभान सिंह यांच्या डोक्यात गोळी लागली. तर बोट चालवणाऱ्या आणखी एका कॉन्स्टेबलच्या हातावर गोळी लागली. या दोघांनाही तातडीने मुर्शीदाबादच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, याठिकाणी कॉन्स्टेबल विजयभान सिंह यांना मृत घोषित करण्यात आले होते.