भारताचं `ऑपरेशन अर्जुन`, पाकिस्तानने भारतासमोर जोडले हात
भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून नेहमीच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असल्याचं पहायला मिळतं. मात्र, आता याच पाकिस्तानला भारताने चांगलाच धडा शिकवला आहे.
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून नेहमीच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असल्याचं पहायला मिळतं. मात्र, आता याच पाकिस्तानला भारताने चांगलाच धडा शिकवला आहे.
सीमेवर गोळीबार करत भारतात घुसखोरी करण्याचा पाकिस्तानाचा नेहमीच प्रयत्न असतो. पाकिस्तानच्या याच प्लॅनला चोख उत्तर देत बीएसएफने म्हणजेच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी 'ऑपरेशन अर्जुन' सुरु केलं. या ऑपरेशन अंतर्गत भारताने पाकिस्तानचं कंबरडचं मोडलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बीएसएफने 'ऑपरेशन अर्जुन' च्या माध्यमातून सीमेवरील पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानचे माजी सैनिकांची घरं आणि पाक रेंजर्स अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला केला.
भारताने केलेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानला मोठा झटका बसला. त्यामुळेच पाकिस्तानने फोन करत भारतीय लष्कराला गोळीबार थांबवण्याची विनंती केली आहे.
बीएसएफने केलेल्या कारवाईनंतर पाक रेंजर्स पंजाब डीजी मेजर जनरल अजगर नवीद हायत खान यांनी बीएसएफचे डायरेक्टर के. के. शर्मा यांना फोन केला. खान यांनी शर्मांना आठवड्यात दोन फोन करुन गोळीबार थांबवण्याची विनंती केली. बीएसएफ डायरेक्टर के. के. शर्मा यांना पाकिस्तानने २२ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर रोजी फोन करुन गोळीबार थांबवण्याची विनंती केली होती.