अर्थसंकल्प २०१८ : रेल्वेच्या गेल्या अर्थसंकल्पातील घोषणांचं नेमकं झालं तरी काय?
केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असताना रेल्वेबाबत यात काय घोषणा होणार? याचीही उत्सुकता आहे. मात्र मागच्या अनेक अर्थसंकल्पांमध्ये झालेल्या घोषणांचं काय झालं, यावरही एक नजर टाकली पाहिजे... हे चित्र तितकंस आश्वासक नाही, असंच म्हणावं लागेल.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असताना रेल्वेबाबत यात काय घोषणा होणार? याचीही उत्सुकता आहे. मात्र मागच्या अनेक अर्थसंकल्पांमध्ये झालेल्या घोषणांचं काय झालं, यावरही एक नजर टाकली पाहिजे... हे चित्र तितकंस आश्वासक नाही, असंच म्हणावं लागेल.
अर्थमंत्री अरुण जेटली गुरूवारी अर्थसंकल्प मांडणार आहेत. यात रेल्वेच्या वाट्याला किती निधी येणार, याबाबत उत्सुकता असताना राज्यातल्या अनेक रखडलेल्या प्रकल्पांची पुन्हा एकदा चर्चा रंगलीय.
रखडलेले प्रकल्प
- कोकण रेल्वेचं दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचं काम धीम्या गतीनं सुरू आहे
- वैभववाडी-कोल्हापूर मार्ग अद्याप कागदावरच आहे.
- कराड-चिपळूण मार्गाचा प्रकल्पही रखडलाय
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही
- वडसा-देसाई गंज-गडचिरोली रेल्वे अद्याप रखडलाय
- खान्देशातल्या शकुंतला रेल्वेचं ब्रॉड गेज करण्याचा मुद्दा आधांतरी आहे
- चर्चगेट-विरार आणि CSMT-पनवेल उन्नत मार्गाचा प्रकल्पही अडगळीत पडलाय
- ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाचं तसंच
- कर्जत-पनवेल मार्गाच्या दुपदरीकरणाचं काम अद्याप रखडलंय
- कळवा दिघा मार्गाच्या कामात प्रगती नाही
- पनवेल-डहाणू लोकलसेवा अद्याप कागदावरच आहे
याखेरीज अनेक रेल्वेमार्गांच्या घोषणा झाल्यानंतर अद्याप कामांना सुरूवात झालेली नाही.
- रोटेगाव-पुणतांबा ३० किलोमीटर
- जालना-खामगाव १६५ किलोमीटर
- मनमाड-मालेगाव-इंदूर ३५० किलोमीटर
- वर्धा-यवतमाळ-नांदेड २७० किलोमीटर
- नांदेड-बीदर १५० किलोमीटर
- नगर-बीड-परळी २५० किलोमीटर
- सोलापूर-औरंगाबाद-जळगाव ४५० किलोमीटर हे प्रकल्प रखडलेलेच आहेत.
मुंबई महाराष्ट्राच्या रखडलेल्या या सगळ्या कामांची भली मोठी यादी पाहता नव्या घोषणांपेक्षा ही रखडेलली काम जलद गतीनं पूर्ण व्हावी अशी मागणी त्यामुळे केली जातेय. रेल्वे ही लाइफलाइन मानली जाते. रेल्वेचा विस्तार म्हणजे विकास. त्यामुळे आता विकासाभिमुख सरकार अशी प्रतिमा असणारं सरकार रखडलेल्या रेल्वे प्रकल्पाची गाडी रुळावर आणणार का ? हे पहावं लागेल.