नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आयकर परतावाबाबत (इन्कम टॅक्स रिटर्न) मोठी घोषणा केली आहे. सीतारामन यांनी ज्या लोकांकडे पॅन कॉर्ड नसेल, ते आधार कार्डच्या मदतीने इनकम टॅक्स रिटर्न फाइल करु शकत असल्याचे स्पष्ट केले आहे. आता देशातील १२० कोटी लोकांकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे करदात्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि सुटसुटीतपणा यावा म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सीतारामन यांनी बजेट सादर करताना सांगितले. आता जिथे कुठे पॅन कार्डची गरज असेल तिथे आधार कार्डवरुन काम केले जाऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत रिटर्न फाइल करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक होते. परंतु आता पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करणेही आवश्यक करण्यात आले आहे. पॅन-आधार लिंक करण्याची शेवटीची तारीख ३० सप्टेंबर करण्यात आली आहे. आधी पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१९ देण्यात आली होती, परंतु आता ही तारीख बदलून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.



या अर्थसंकल्पात अनिवासी भारतीयांसाठीही आधारकार्डसाठीचे नियम अधिक सोपे करण्यात आले आहेत. ज्यावेळी अनिवासी भारतीय मायदेशी येतील, त्यावेळी त्यांच्या पासपोर्टच्याआधारे त्यांना आधारकार्ड देण्यात येणार आहे. आता अशा अनिवासी भारतीयांना आधारकार्डसाठी १८० दिवसांसाठी वाट पाहण्याची गरज भासणार नाही.