Budget 2019 : शिक्षण आणि खेळासाठी काय तरतूद ?
उच्च शिक्षणासाठी ४०० कोटी देण्यात येणार
नवी दिल्ली : नवीन शैक्षणिक धोरण आणले जाईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज संसदेत केली. अर्थसंकल्प २०१९ चे सादरीकरण करताना त्या बोलत होत्या. नव्या धोरणानुसार शाळा, कॉलेजमध्ये बदलाचे प्रावधान असेल असेही त्या म्हणाल्या. आॅनलाईन कोर्स वाढविण्याकडे सरकारचे लक्ष्य असून उच्च शिक्षणासाठी ४०० कोटी देण्यात येतील असेही त्या म्हणाल्या.
जगातील २०० शैक्षणिक संस्थामध्ये भारताच्या ३ संस्था आहेत. त्यात भारताच्या २ आयआयटी आहेत. यापूर्वी एकही नव्हते असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय संशोधन संस्था उभारली जाणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रासाठीही महत्त्वाच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय क्रीडा बोर्ड स्थापन केले जाणार असून १ कोटी तरुणांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तसेच खेलो भारतवर भर दिला जाईल असे यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या. परदेशात नौकरीसाठी प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खेळाच्या विकासाठी प्रत्येक क्षेत्रात काम होईल असेही त्या म्हणाल्या.