Budget 2019 VIDEO : मंत्र्यांना फोटोबॉम्ब करणारी `ती` मुलगी सोशल मीडियावर चर्चेत
नेटकऱ्यांच्या सुस्साट प्रतिक्रियांना सुरुवात
नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्र्यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्रीपदावर असणाऱ्या पीयुष गोयल यांनी शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पाविषयी केंद्रापासून ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बऱ्याच चर्चांना उधाण आलं. दिल्लीत तर मंत्रीमहोदयांमध्येही हा विषय विशेष लक्ष वेधी ठरला. याच चर्चांच्या वातावरणात माध्यमांशी अर्थसंकल्पाविषयी आपले विचार मांडतानाचा एका मंत्रीमहोदयांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अर्थातच त्या मंत्र्यांनीही अर्थसंकल्पाविषयीचे आपले विचार मांडले, पण व्हिडिओ हा त्यांच्या वक्तव्यामुळे नव्हे तर, त्यांच्या पाठी उभं राहून कॅमेराकडे पाहत वाकुल्या करुन दाखवणाऱ्या मुलीमुळे चर्चेत आला आहे. केंद्रात असणाऱ्या राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचा हा व्हिडिओ असून, ते अर्थसंकल्पाविषयी आपले विचार मांडताना त्यांच्या पाठी एक मुलगी वारंवार चित्रविचित्र प्रकारे हावभाव करत वाकुल्या करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांनीच शेअर केला असून, आता ती मुलगी आहे तरी कोण हाच प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मुख्य म्हणजे अर्थसंकल्पाच्या गंभीर चर्चा आणि एकंदर वातावरणात त्या मुलीचा व्हिड़िओ मात्र विषयाला वेगळ्या, हलक्याफुलक्या वळणावर नेत असल्याचं मतही काही नेटकऱ्यांनी मांडलं आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाचे मीम्स व्हायरल होण्यापूर्वी जयंत सिन्हा यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने या मुलीचाच व्हिडिओ जास्त व्हाय़रल होत असल्याचं चित्र दिसत आहे.