नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी पहिल्यांदा बजेट सादर केलं आहे. मात्र बजेट सादर  झाल्यानंतर मध्यमवर्गीय आणि करदाता वर्गाला मोठा धक्का बसला आहे. कोरोना संकटानंतर सादर होण्याऱ्य़ा बजेटवर सर्वसामान्य जनतेच्या आशा टिकून होत्या. गेल्या काही दिवसांपासून टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होतील अशी अपेक्षा होती. पण या बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि नवीन घर खरेदी करणाऱ्यांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिलाय. ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्यांना ITR भरावा लागणार नाही. पेंशन घेणाऱ्या व्यक्तींना हा लाभ मिळणार आहे. एनआरआय लोकांना टॅक्स भरण्यासाठी खूप अडचणी यायच्या. पण त्यांना आता डबल टॅक्स सिस्टिममधून सवलत देण्यात येणार आहे. 
 
बँकेचा दिवाळा निघाल्यानंतर खातेधारकांना मिळणार एवढे पैसे
याआधी बँकेचा दिवाळा निघाल्यानंतर किंवा बँक बुडाल्यानंतर खातेधारकांना फक्त 1 लाख रूपयांपर्यंत भरपाई मिळत होती. पण आता बँक ठेवींवरील विमा 1 लाखांवरून 5 लाखांवर करण्यात आला आहे. याचा अर्थ बँक बुडाल्यानंतर खातेधारकांना जवळपास 5 लाखांपर्यंत भरपाई मिळेल.


नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी खास योजना
स्वस्त घरांच्या खरेदीसाठी सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत एका वर्षाच्या गृहकर्जाच्या व्याज देयकावर 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त कर कपात करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या यानिर्णयामुळे रिटेल व्यवसायाला तेजी मिळणार आहे. 45 लाख रूपयांपर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 



वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दुर्लक्ष
कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मोठ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली. मध्यंतरी या कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये लाभ होईल अशी चर्चा रंगली होती. पण बजेटमध्ये घर बसल्या काम करणाऱ्यांना कोणताही फायदा मिळणार नाही. 


या वस्तू होणार महाग
मोबाइल आणि चार्जर महागणार , तांब्याच्या गोष्टी महागणार , इलेक्ट्रॉनिक सामान महागणार , कॉटनचे कपडे महागणार, रत्न महागणार, लेदलच्या गोष्टी महागणार, सोलर इन्वर्टर महागणार.