मुंबई : चार दिवसांपूर्वी दिल्लीतील बुराडी परिसरातील एका घरात ११ जणांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या प्रकरणाबाबत मोठा खुलासा झाला आहे. यावरुन हे सिद्ध होते की, संपूर्ण कुटुंब हे घरातील मोठा मुलगा ललितच्या म्हणण्याप्रमाणे वागत असे. 


काय आहे हे गूढ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललितने लिहून ठेवले होते की, शेवटच्या वेळी अखरेच्या इच्छापूर्तीवेळेस आकाश हलेल, धरती कंपेल, यावेळी तुम्ही घाबरु नका. मंत्रपठण वाढवा, मी येऊन तुम्हाला उतरवेन, बाकीच्यांनाही उतरवण्यात मदत करेन. याप्रकरणाची चौकशी करत असताना घराची तपासणी केल्यानंतर पोलीसांना ४ रजिस्टर आणि ५०-६० पाने देखील मिळाली. ज्यावर हातांनी लिहिले होते. त्यातील एक रजिस्टरवर लिहिले होते की, शुक्रवारच्या रात्री किंवा रविवारी रात्री १२ वाजल्यानंतर घरात हवन-पूजा करायची आहे. पुजापाठ करताना घरात कोणी आल्यास ही क्रिया दुसऱ्या दिवशी करावी. त्यानंतर पूजा पाठ यज्ञ संपत्तीच्या क्रियेनंतर मोक्ष क्रिया करायची आहे. 


मोक्षप्राप्तीसाठी हवन करत असताना कानात कापूस घाला आणि तोंडावर-डोळ्यांवर पट्टी बांधा. त्यामुळे एकमेकांना पाहू शकणार नाही, ओरडू शकणार नाही. अखरेच्या इच्छापूर्तीवेळेस आकाश हलेल, धरती कंपेल, यावेळी तुम्ही घाबरु नका. मंत्रपठण वाढवा. जेव्हा गळ्यात फास डाकून क्रिया कराल तेव्हा साक्षात दर्शन देईल आणि येऊन वाचवेन. आत्मा या ११ पाईपमधून बाहेर पडतील आणि पु्न्हा याच पाईपातून परत येतील. तेव्हा तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल.


वृद्ध महिलेला बेडरुममध्ये मुक्ती


एक रजिस्टरमध्ये वृद्ध महिलेबद्दल लिहिले होते की, हिचे शरीर भारी आहे त्यामुळे लटकणे अवघड असल्याने तिला बेडरुममध्ये मुक्ती द्या.


ललितच्या स्वप्नात येत होते त्याचे वडील


हे सर्व रजिस्टर पाहिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ललितच्या अंगात त्याच्या वडीलांची आत्मा येत असे. त्याच्या वडीलांनी स्वप्नात त्याला जे काही सांगितले ते त्याने रजिस्टरमध्ये लिहिले आणि घरातील इतर सदस्यांनाही तसेच करण्यास सांगितले. रजिस्टरमध्ये लिहिलेल्या गोष्टींवरुनच कुटुंबातील सदस्यांनी फाशी घेतली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 


होणार या गोष्टींचा उलघडा


दिल्ली पोलिस सध्या ललितच्या आयुष्याचा उलघडा करण्यासाठी शोध घेत आहेत. त्यानंतर ही माहिती समोर येईल...


  • ललितचे मित्र कोण आहेत?

  • ललितचे लाईफस्टाईल काय होते?

  • ललित कोणाच्या जवळचा होता?

  • ललित आपल्या कुटुंबियांशी वागणूक कशी होती?

  • ललित वडीलांचा सर्वात लाडका मुलगा होता का?

  • केव्हापासून त्याच्या मनात असे विचार येऊ लागले किंवा वडीलांचा भास कधी पासून होऊ लागला?

  • ललितचा आवाज कसा गेला? याचीही शोध घेतला जाईल.