अहमदाबाद: गुजरातच्या डांग जिल्ह्यात शनिवारी रात्री प्रवाशांना घेऊन जाणारी बस ३०० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ७५ जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, महाल ते बर्डीपाडा या मार्गावर प्रवास करणाऱ्या या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. अहवा परिसरात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत जाऊन कोसळली. 



या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने बचावकार्याला सुरुवात केली. अजूनही दरीत पडलेल्या बसमधून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, ५० प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये तब्बल ८५ प्रवाशी कोंबण्यात आले होते. त्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे.