COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वाढली आहे. लोक केवळ इलेक्ट्रिक वाहनांबद्दल इंटरनेट शोधत नाहीत तर ते खरेदीदेखील करत आहेत. मोठ्या शहरांतील रस्ते आता इलेक्ट्रिक वाहनांनी भरताना दिसून येत आहे.


परंतू इलेक्ट्रिक कार घेण्याआधी काही महत्वपूर्ण बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असते, अन्यथा कार घेऊन तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. जाणून घेऊ या ६ महत्वाचे मुद्दे...


1. कार स्पेसिफिकेशन
 
इलेक्ट्रिक कारची रेंज जगभरात पसरली आहे. इलेक्ट्रिक मोटर्सपासून ते वेगवेगळ्या क्षमतेचे बॅटरी पॅक उपलब्ध आहेत. तुम्ही तुमची इलेक्ट्रिक कार निवडण्यापूर्वी, तुमच्या प्रवासाची गरज जाणून घ्या. नंतर कार खरेदी करा.


2. ड्राइव्ह रेंज


इलेक्ट्रिक कारबाबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कारची ड्राइव्ह रेंज. म्हणजेच कार सिंगल चार्जिंगवर किती किलोमीटर धावू शकते. कार खरेदी करताना निर्मात्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेऊ नका. वास्तविक कार किती किमीपर्यंत धावते याची चाचपणी करा.


3. बॅटरीचे आयुष्य


कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे बॅटरी होय. यासोबतच बॅटरी हा इलेक्ट्रिक कारमधील सर्वात महाग पार्ट आहे. जर तुम्ही कार खरेदी करताना बॅटरीकडे लक्ष दिले नाही किंवा संशोधन केले नाही, तर भविष्यात बॅटरी बदलणे तुमच्या खिशाला खूप जड जाऊ शकते. त्यामुळे कमी देखभाल खर्च आणि जास्त बॅटरी आयुष्य असलेली बॅटरी निवडा.


4. चार्जिंग पर्याय


बाजारात इलेक्ट्रिक कार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ते चार्ज करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. फास्ट चार्जिंग, स्टँडर्ड चार्जिंग आणि स्लो चार्जिंग. जलद चार्जिंगसाठी चार्जर इस्टॉल करणे खूप कठीण असते. स्टँडर्ड आणि स्लो चार्जिंग तुम्ही तुमच्या घरी देखील इंस्टॉल करू शकता. त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापूर्वी चार्जिंगच्या योग्य पर्यायांचाही विचार करा.


5 अतिरिक्त खर्च


इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याआधी खूप विचार करावा लागतो. कार खरेदी करण्याव्यतिरिक्त, त्या संबंधित काही इतर खर्च आहेत. त्यासाठी होम चार्जर, चार्जिंग स्टेशन बसवणे, चार्जिंग स्टेशनची देखभाल यासाठी पैसे खर्च करावे लागतात. 


6. सॉफ्टवेअर अपडेट


प्रगत तंत्रज्ञानानुसार इलेक्ट्रिक वाहने किंवा कार बाजारात दाखल झाल्या आहेत. कार उत्पादक सहसा सॉफ्टवेअर अपडेट्स करून नवीन टेक्नॉलजीचा वापर वापरतात. कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला नियमित सॉफ्टवेअर अपडेट मिळत असल्याची खात्री करा. परदेशातील काही कार उत्पादक विनामूल्य नियमित सॉफ्टवेअर अपडेट देतात परंतु काही उत्पादक त्यासाठी पैसे आकारतात.