अंतराळात अडकलेल्या Sunita Williams ला परत आणण्यासाठी ISRO स्पेसक्राफ्ट पाठवणार? हे शक्य आहे का?
Can India Sent Spacecraft To Help Sunita Williams Rescue Mission: केवळ 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेली सुनिता विल्यम्स आता थेट पुढील वर्षी पृथ्वीवर परत येणार असं नासाकडून सांगितलं जात असतानाच इस्रोने काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Can India Sent Spacecraft To Help Sunita Williams Rescue Mission: नासाने एलॉन मस्क यांच्या 'स्पेसएक्स'च्या मदतीने इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर अडकलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बेरी विलमोअर यांना परत आणण्याची योजना आखली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये या दोघांना परत आणलं जाणार आहे. एवघ्या 8 दिवसांसाठी अंतराळात गेलेले हे दोघेजण 8 महिने तिथे अडकून पडले आहेत. मात्र आता त्यांना तांत्रिक अडचणींमुळे परतणं कठीण झालं आहे.
नासाने काय सांगितलं?
सुनिता विल्यम्स आणि बेरी विलमोअर हे दोघे आठ दिवसांच्या मोहिमेसाठी बोईंगच्या स्टारलायनरमधून पोहोचले. मात्र बोईंगच्या या कॅपसूलमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आता त्यांना 78 दिवसांहून अधिक काळ अंतराळात रहावं लागणार आहे. हे दोघेही आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात परत येतील असं नासाने सांगितलं आहे. मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीचं ड्रॅगन नावाच्या स्पेसक्राफ्ट त्यांना परत पृथ्वीवर घेऊन येईल, असं नासाने सांगितलं आहे. हे स्पेसक्राफ्ट नियमित चाचण्यांसाठी पुढील महिन्यामध्ये अंतराळामध्ये झेप घेणार आहे.
भारत अंतराळयान नाही पाठवू शकत का?
दरम्यान, सुनिता विल्यम्सला पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी भारत काही मदत करु शकतो का? यासंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या प्रमुखांनी आपलं मत मांडलं आहे. इस्रोचे अध्यक्ष एस, सोमनाथ यांनी नुकतेच एका पॉडकास्टमध्ये यासंदर्भात भाष्य केलं. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला सध्या उपलब्ध स्रोत आणि इतर गोष्टींचा विचार केला तर अंतराळामध्ये अशी मदत करता येईल की नाही हे सांगितलं. अंतराळात अडकलेल्या या दोन अंतराळविरांना वाचवण्यासाठी इस्रो एखादी मोहीम राबवू शकत नाही का? हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न एस, सोमनाथ यांना विचारण्यात आला. "सध्या आपण काहीच करु शकत नाही. आपल्याकडे सध्या सध्या असं अंतराळयान नाही जे तिथे (अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर) जाऊन तिला वाचवू शकेल. आपल्यासाठी हे शक्य नाही," असं एस. सोमनाथ यांनी स्पष्टपणे सांगितलं.
नेमकी समस्या काय?
एस. सोमनाथ यांनी बोईंग स्ट्रारलाइनरमधील तांत्रिक बिघाडा नेमका काय आहे याबद्दलची माहितीही दिली. हे अंतराळयान या दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सक्षम नाही असं एस. सोमनाथ म्हणाले. "बोईंग स्ट्रारलाइनरमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. कोणताही धोका स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. त्यांनी धोका पत्कारुन हे लॉन्च केलं. मात्र आता त्यांना परत येताना हा धोका घ्यायचा नाहीये," असं सोमनाथ यांनी सांगितलं.