नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षांपासून लहान मुलांचे प्रोडक्स बनवणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरच्या एका बॉटलमध्ये कॅन्सर होण्याचा मोठा धोका असणारी एस्बेस्टसची मात्रा आढळून आल्याचे समोर आले आहे. एस्बेस्टस आढळून आल्यानंतर कंपनीने जवळपास ३३ हजार बेबी पावडरच्या बॉटल परत मागवल्या असल्याची माहिती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या कित्येक महिन्यांपासून पावडरमध्ये कॅन्सरकारक घटक नसल्याचे नाकारल्यानंतर आता कंपनीने, ऑनलाइन विक्रेत्यांकडून खरेदी केलेल्या बेबी पावडरच्या नमुन्यांमधून नियामकांना एस्बेस्टसची मात्रा आढळून आल्याचे सांगितले आहे. 


एस्बेस्टसची मात्रा आढळून आल्याचे समजताच, कंपनीच्या शेअर्समध्ये ४.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीने आपले प्रोडक्ट बाजारातून पुन्हा मागवले, असे पहिल्यांदाच झाल्याचे बोलले जात आहे.


एस्बेस्टसची मात्रा आढळल्यानंतर खबरदारीच्यादृष्टीने ३३ हजार बेबी पावडर पुन्हा मागवल्या असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये हजारो चाचण्यांमधून आमच्या पावडरमध्ये एस्बेस्टस नाही, असे समोर आले असल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. 


याआधीदेखील जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटक असल्याचे समोर आले होते. याबाबत महिलांकडून अनेक आरोपही करण्यात आले, मात्र आतापर्यंत कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले होते. याबाबत कंपनीवर दंडही ठोठावण्यात आला होता.