Video: 160 kmph वेगाने मुंबईला येणाऱ्या कारचा अपघात, दोघे ठार; Insta Live मध्ये घटनाक्रम कैद
160 kmph Car Accident While Instagram Live: या कारमध्ये एकूण पाच तरुण प्रवास करत होते. त्यापैकी मागील बाजूला बसलेल्या एकाने अपघातापूर्वीच इन्स्टाग्रामवरुन लाइव्ह वेबकास्ट सुरु केलं होतं. त्याचदरम्यान हा भीषण अपघात झाला.
160 kmph Car Accident While Instagram Live: अल्पावधीत लोकप्रिय होण्याच्या नादात दोन तरुणांनी प्राण गमावल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. वय वर्ष 22 ते 27 दरम्यान असलेल्या 5 तरुणांनी अहमदाबाद ते मुंबई प्रवासादरम्यान केलेली स्टंटबाजी दोघांच्या जीवावर बेतली आहे. मारुती सुझुकी ब्रिझा कारने मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना या तरुणांनी इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून आपला प्रवास फॉलोअर्सबरोबर शेअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र इन्स्टाग्राम लाइव्ह सुरु केल्यानंतर त्यांच्या गाडीने तब्बल 160 किलोमीटर प्रती तास वेग पकडला आणि याच वेगाने त्यांचा घात केला. हा सारा घटनाक्रम इन्स्टाग्राम लाइव्ह व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला आङे.
काय दिसतंय या व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओच्या सुरुवातीला दोन तरुण आपल्या फॉलोअर्सला हाय-हॅलो करताना दिसतात. हळूहळू या लाइव्ह स्ट्रीमवर अनेकजण जॉइन होतात. उजाडण्यापूर्वी हे लाइव्ह स्ट्रीम करण्यात आल्याने मोबाईलच्या फ्लॅशलाइट वापरल्याचं दिसत आहे. या व्हिडीओत गाडीमध्ये कोणकोण बसलं आहे हे दाखवलं जातं. कारमधील सर्वच तरुण उत्साहात असल्याचं दिसत आहे. त्यानंतर हा कॅमेरा गाडीच्या स्पीडोमीटरवर फोकस करतो. त्याचवेळी गाडीतील एकजण, "बघा कार किती वेगाने धावत आहे," असं म्हणतो. त्यावेळेस गाडीचा वेग 160 किलोमीटर प्रती तास इतका असल्याचं स्पीडोमीटवर दिसत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतं. यानंतर ही मुलं शिव्या देताना ऐकू येतं. रस्त्यावरुन जाताना शेजारच्या गाडीतील चालकाला उद्देशून त्या दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ब्रेकचा आवाज, धडकल्याचा आवाज अन्...
100 किलोमीटर प्रती तासाहून अधिक वेग पकडते तेव्हाच चालक उजवीकडे आणि डावीकडे स्टेअरिंग वळवत अगदी काही सेकंदांमध्ये अनेक गाड्यांना ओव्हरटेक करतो. हा सारा थरार गाडीतील सर्व तरुण एन्जॉय करत असल्याचं दिसत आहे. त्यापैकी एकजण चालकाला 'अजून एक गाडी' असं म्हणत पुन्हा इतर गाड्यांना ओव्हरटेक करण्यास प्रवृत्त करतो. मात्र पुढल्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. ब्रेक दाबल्याचा आवाज ऐकू येतो आणि गाडी कशातरी धडकल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर जाणवतं. मोठा आवाज होऊन व्हिडीओ बंद पडतो.
दोघांचा मृत्यू
हा सारा घटनाक्रम 2 मेच्या मध्यरात्रीनंतर पहाटे साडेतीन ते साडेचारदरम्यान घडला. या अपघातामध्ये अमन मेहबुबभाई शेख आणि चिरागकुमार के. पटेसल या दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही अहमदाबादचे रहिवाशी आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेले इतर तिघे जणही अहदाबादचेच असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, असं एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटलं आहे. पाहा या दुर्घटनेपूर्वी नेमकं या कारमध्ये काय काय घडलं त्याचा व्हिडीओ...
झाडाला धडकली कार, चालक वाचला
गुजरातमधील अडास येथे या पाच जणांची कार एका झाडाला धडकली. अहमदाबादपासून 100 किलोमीटरवर हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग 48 वर झालेल्या या अपघाताप्रकरणी पोलिसांनी कारचा चालक मुस्तफा ऊर्ज शादाब खान पठाणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या शादाबवर उपचार सुरु आहेत.