अभियंत्याच्या घरावर पडला छापा; रोख रक्कम पाहून अधिकऱ्यांनाही बसला धक्का
अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे
बिहारच्या (Bihar) पाटणा जिल्ह्यातील ग्रामीण बांधकाम विभागात तैनात असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. किशनगंज आणि पाटणा येथील कार्यकारी अभियंता संजय कुमार राय यांच्या ठिकाणांवर पाळत ठेवणाऱ्या पथकाने शनिवारी त्यांच्या घरी छापे (Raid) टाकले.
यावेळी घरातून सुमारे 3 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूही मोठ्या प्रमाणात सापडण्याची शक्यता आहे. तसेच अद्यापही नोटांची मोजणी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील ग्रामीण बांधकाम विभागाचे अभियंता संजय कुमार राय यांच्या घरावर दक्षता पथकाने छापा टाकला. ग्रामीण बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंत्याच्या घरातून तीन कोटींहून अधिकची रोकड जप्त करण्यात आली आहे.
राजधानी पाटणा आणि अन्य भ्रष्ट अभियंत्यांच्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. रोख रकमेशिवाय दागिने आणि जमिनीची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
अधिकाऱ्यांनी भ्रष्ट अभियंत्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. घरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा आढळल्याने अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.
पोलीस उपायुक्त अरुण पासवान यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला. कार्यकारी अभियंता संजय राय यांचे रोखपाल खुर्रम सुलतान आणि वैयक्तिक अभियंता ओम प्रकाश यादव यांच्याकडेही रोकड सापडली असून त्यांचीही मोजणी सुरू आहे.
अरुण पासवान म्हणाले की, मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. मशीनमधून मोजणी सुरू आहे. आतापर्यंत 2 कोटींहून अधिकची मोजणी झाली आहे.