चिमुरड्याच्या घशात अडकला काजू, आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
पालकांना आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्या, खेळता-खेळता चिमुरड्याने काजू गिळला, पण तो त्याच्या श्वसननलिकेत जाऊन अडकला
Shocking News : मन हेलावणारी एक घटना समोर आली आहे. घशात काजू अडकल्याने एका चिमुरड्याचा श्वास बंद झाला. आई-वडिलांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, पण दुर्देवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कार्तिक कुमार असं या दोन वर्षांच्या चिमुरड्याचं नाव होतं. काजूचा तुकडा त्याच्या श्वसननलिकेत अडकला (Cashew gets stuck in throat). त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डोळ्यादेखत आपल्या लाडक्या मुलाचा मृत्यू झाल्याचं पाहून आई आणि वडिल दोघंही रुग्णालयातच बेशुद्ध पडले.
खेळता-खेळता काजू गिळला
ही घटना बिहारमधल्या (Bihar) चंपारण इथली आहे. इथे राहणारे राजेश कुमार यांच्या दोन वर्षांचा मुलाग कार्तिक कुमार हा घरात खेळत होता. एका टेबलवर वाटीत काजू ठेवले होते. खेळता-खेळता कार्तिक कुमारने त्या वाटीतील काजूंपैकी एक काजू गिळला. पण यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. कार्तिकचा आरडा-ओरडा ऐकून त्याचे आईवडिल तात्काळ धावत आले. मुलांची स्थिती पाहून त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं.
मुलाला डॉक्टरांनी ऑक्सीजन लावला. तब्बल वीस मिनिटं मुलाला वाचवण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले. पण दुर्देवाने मुलाचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलाचा डोळ्यादेखत झालेल्या मृत्यूने राजेश कुमार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
महाराष्ट्रातही अशीच घटना
महाराष्ट्रातल्या गुहागरमध्येही (Guhagar) काही दिवसांपूर्वी अशीच दुर्देवी घटना घडली होती. जेली (Jelly chocolate) घशात अडकल्याने 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला. गुहागरमधल्या साखरीआगर गावात ही मन हेलावणारी घटना घडली. उपचारासाठी डॉक्टरकडे नेत असताना रस्त्यातच बाळाचा मृत्यू झाला. रिहांश तेरेकर असं मृत बाळाचे नाव होतं. पालकांनी आपल्या पाल्यांना कोणतं चॉकलेट देत आहोत, तसेच ते चॉकलेट खाण्यायोग्य ते बाळ आहे की नाही, या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे.
साताऱ्यातही 1 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
त्याआधी एक महिन्यापूर्वी साताऱ्यातही (Satara) अशीच घटना घडली होती. जेली चॉकलेट खाल्ले असता ते घशात अडकल्याने एक वर्षाच्या चिमुकीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिला तातडीने दवाखानात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शर्वरी सुधीर जाधव असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ही घटना साताऱ्यातील कर्मवीरनगरामध्ये घडली होती. घराशेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने शर्वरीला जेली चॉकलेट दिलं. शर्वरीने ते चॉकलेट गिळलं, पण ते तिच्या घशात जाऊन अडकलं, तिला श्वास घ्यायला त्रास सुरु झाली आणि काही वेळातच ती बेशुद्ध पडली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.