ग्रामीण भागातील रोजंदारीच्या कामात लक्षणीय घट; तीन कोटी शेतमजुरांनी रोजगार गमावले
शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगाराचे प्रमाण ४ टक्क्यांनी वाढले आहे, पण...
नवी दिल्ली: देशभरात रोजंदारीवर काम करणाऱ्या शेतमजुरांच्या रोजगारात लक्षणीय घट झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या (एनएसएसओ) कालबद्ध रोजगार सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. त्यानुसार २०११-१२ ते २०१७-१८ या काळात देशभरात रोजंदारीवर काम करणआऱ्या तब्बल ३.२ कोटी मजुरांनी उत्पन्नाचे साधन गमावले आहे. यापैकी तीन कोटी रोजगार हे शेती क्षेत्रातील आहेत. टक्केवारीनुसार याचा विचार करायचा झाल्यास २०११-१२ च्या तुलनेत रोजंदारीवर मिळणारी कामे ४० टक्क्यांनी कमी झाली आहेत.
ग्रामीण भागात शेती आणि इतर ठिकाणी रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा याच उत्पन्नातून निर्माण होतो. एनएसएसओच्या सर्वेक्षणानुसार रोजंदारीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची संख्या १५ लाखांनी कमी झाली आहे. यापूर्वी हे प्रमाण ३६ लाख होते, ते आता २१ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे.
शेती आणि बिगरशेती क्षेत्रातील रोजंदारीचा अधिक बारकाईने आढावा घेतल्यास २०११-१२ पासून पुरुषांच्या रोजगारात ७.३ टक्के आणि महिलांच्या रोजगारात ३.३ टक्क्यांची घट झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने डिसेंबर २०१८ मध्येच एनएसएसओच्या या अहवालाला मान्यता दिली होती. मात्र, केंद्र सरकार अजूनही हा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करत आहे.
मोदी सरकारचा पाय आणखी खोलात; रोजगारासंदर्भातील तिसरा अहवालही नकारात्मक?
मात्र, दुसरीकडे या अहवालात आणखी एक बाब समोर आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगाराचे प्रमाण ४ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, यासाठीही शेतमजुरांचे घटलेले प्रमाणच कारणीभूत असल्याचे दिसते. कारण, कृषी क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे मालकांना शेतमजूर परवडेनासे झाले आहेत. त्यामुळे कुटुंबातीलच व्यक्तींना शेतीच्या कामांना जुंपण्याचे प्रमाण वाढल्याने स्वयंरोजगार वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.