जंटलमन चिदंबरम बनले `मिस्टर ४२०`, घरावर सीबीआयची नोटीस
माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या घराबाहेर सीबीआयने नोटीस लावली आहे.
नवी दिल्ली : माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या घराबाहेर सीबीआयने नोटीस लावली आहे. त्यांच्यावर फसवणूकीचे कलम ४२० लावण्यात आले आहे. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती जंटलमन चिदंबरम ‘मिस्टर ४२०’ बनल्याची. सीबीआयने चिदंबरम यांच्या घराबाहेरच्या गेटवर नोटीस लावली आहे. त्यात फसवणूक आणि विश्वासघात केल्याचे भारतीय दंड संविधानचे कलम ४२० लावले आहे.
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिदंमबरम यांना जामीन मिळणं कठीण दिसतं आहे. चिदंबरम यांच्या याचिकेत त्रुटी निघाल्यामुळे त्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यात सुधारणा करण्याचे आदेश देऊ शकतं. तर दुसरीकडे याप्रकरणी सीबीआयनं कॅव्हेट नोटीस जारी केली आहे.
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या पी. चिदंबरम यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अटक थांबवावी अशी याचिका चिदंबरम यांनी केली होती त्यावर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. न्या. एन. व्ही. रमणा यांच्या न्यायालयासमोर आज ही याचिका सुनावणीसाठी आली होती. मात्र, न्या. रमणा यांनी या प्रकरणावर निर्णय देण्यास नकार देत आधी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर याबाबत दाद मागावी असा सल्ला चिदंबरम यांच्या वकिलांना दिला. मात्र, चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी तोपर्यंत दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती तरी द्यावी अशी विनंती कोर्टाला केली. मात्र, न्या. रामणा यांनी यालाही नकार दिला.
चिदंबरम यांना दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे. कारण मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई सध्या अयोध्याप्रकरणाची सुनावणी करत असल्याने त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता धूसरच आहे. चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयने लूकआऊट नोटीस काढली आहे. चिदंबरम देशाबाहेर पळून जाण्याची भीती असल्याने सीबीआयने लुक आऊट नोटीस काढली आहे.
दरम्यान चिदंबरम यांना अटक करण्यासाठी कालपासून चार ते पाच वेळा सीबीआय आणि ईडीचं पथक चिदम्बरम यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहचलं. मात्र चिदंबरम घरी नसल्यामुळे तपासयंत्रणांना माघारी फिरावं लागलं. अखेर चिदंबरम यांच्या घराबाहेर सीबीआयकडून नोटीस लावण्यात आली असून दोन तासात सीबीआयसमोर हजर राहण्याचं सांगण्यात आलं. दरम्यान पी चिदंबरम हे अजूनही सीबीआयसमोर हजर झालेले नाही.