पाटणा : हॉटेल हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने बिहारमधील संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या  १२ मालमत्तांवर छापे मारले. दरम्यान, लालूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत भर पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालू प्रसाद यांच्या पाटण्यातल्या घरासह एकूण १२ ठिकाणी सीबीआयनं धाडी टाकल्या आहेत. २००६मध्ये रेल्वे मंत्री असताना लालूंनी त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलांना रेल्वेच्या हॉटेलांचे ठेके दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. दिल्ली, पाटणा, रांची, पुरी आणि गुडगावमध्ये हे धाडसत्र सुरु आहे.


लालूप्रसाद  रेल्वेमंत्री असताना २००६ मध्ये रेल्वेच्या मालकीचे पूरी आणि रांची येथील हॉटेल एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. हॉटेलचा विकास करणे, देखभाल-दुरुस्ती करणे आणि चालवण्याचे कंत्राट या कंपनीला दिले होते. या व्यवहारपोटी संबंधीत कंपनीने पाटणा येथे दोन एकरची जागा लालूसंबंधीत कंपनीच्या नावावर केली. या संशयास्पद व्यवहाराचा सीबीआयकडून तपास सुरु होता.


सीबीआयच्या पथकाने दिल्ली, पाटणा, रांची, पूरी, गुरुग्राम तसेच लालूप्रसाद यादव आणि आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचे निवासस्थान अशा १२ ठिकाणी छापे टाकले. 


सीबीआयने लालूप्रसाद यादव आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  लालूंसह त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी आणि आयआरसीटीसीच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे.


दरम्यान, याआधी दिल्ली, गुरुग्राम आणि हरयाणातील रेवाडी आदी २२ ठिकाणी प्राप्तिकर खात्याने मे महिन्यात छापे टाकले होते. याशिवाय कन्या मिसा भारतीच्या बेनामी संपत्तीचे प्रकरण आणि चारा घोटाळ्यातील सर्व खटले एकत्रित चालविण्याऐवजी स्वतंत्रपणे चालविण्याचा दणका देणारा सर्वोच्च न्यायालयाने आदेश यामुळे लालूप्रसाद यादव आधीपासूनच अडचणीत आले होते.