सुशांतसह दिशा सालियान प्रकरणाचा तपास ही सीबीआय करणार
सुशांतसिंह राजपूतशी संबंधित इतर प्रकरणांची चौकशी देखील सीबीआय करणार
मुंबई : सीबीआय आता बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी आदेश जारी करताना त्यावर शिक्कामोर्तब केला. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी सुशांतच्या वडिलांनी आणि बिहार सरकारकडून केली जात होती. त्याच वेळी वकील विकास सिंह यांनी पत्रकार परिषद देताना एक मोठी गोष्ट सांगितली.
ते म्हणाले की, 'आज मोठा दिवस आहे. या युद्धामध्ये आम्हाला न्यायाची वाट पहावी लागली, परंतु कोर्टाने मोठा निर्णय दिला. कोर्टाने सीबीआय चौकशीची मान्यता दिली. तसेच यासंदर्भातील प्रत्येक खटल्याची चौकशीही कोर्टाने सीबीआयकडे सोपविली आहे. म्हणजेच सुशांत प्रकरणाबरोबरच सीबीआय दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची देखील चौकशी करू शकेल. बिहार पोलिसांकडे एफआयआर नोंदविण्याचा अधिकार असल्याचे कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले. तसेच, बिहार सरकारने सीबीआय चौकशीची केलेली शिफारसही योग्य होती. सीबीआयच्या तपासानंतर कुटुंबाला न्याय मिळेल.'
सुशांत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयने स्थापन केलेली एसआयटी टीम लवकरच मुंबई पोलिसांचे नोडल ऑफिसर (डीसीपी क्रोम शाखा अधिकारी) आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती जसे कागदपत्रे, स्टेटमेन्टस, फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्ट मार्टम रिपोर्ट, मोबाईल यांची माहिती घेतील.
दुसरीकडे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं की, 'सुशांत प्रकरणात न्याय मिळेल. या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयावर देशातील जनतेचा विश्वास वाढला आहे.'