सीबीएसई बोर्ड (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याची तयारी करत आहे. सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेच्या आगामी सत्रात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पूर्ण प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. त्याला अनुसरुन वर्षातून 2 परीक्षा घेऊ शकतं. शिक्षण मंत्रालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला आगमी शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये दोन वेळा बोर्ड परीक्षांचं आयोजन करण्याच्या योजनेवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर सीबीएसई आता नव्याने शैक्षणिक कॅलेंडर कशाप्रकारे तयार करायचं याचा विचार करत आहे. पदवीपूर्व प्रवेश परीक्षांवर परिणाम न होता, वर्षातून 2 वेळा बोर्ड परीक्षांचं आयोजन कसं करायचं याचा विचार बोर्ड करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 'शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला वर्षातून दोनदा परीक्षा कशाप्रकारे घेता येईल याचा विचार करण्याचा आणि त्यानुसार योजना आखण्याचा आदेश दिला आहे. बोर्ड त्यावर काम करत आहे. पुढील महिन्यात यासंबंधी शाळेच्या मुख्याध्यापकांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे'. आचारसंहिता संपल्यानंतर सीबीएसई दोन वेळा बोर्ड परीक्षा आयोजित करण्याच्या योजनेला अंतिम रुप देण्यासाठी वेगवेगळ्या शाळांशी चर्चा करेल. 


पण दोन परीक्षा कशासाठी?


विद्यार्थी बोर्ड परीक्षांपासून तणावमुक्त व्हावेत तसंच त्यांना अधिक संधी मिळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं की, अनेकदा विद्यार्थी आपलं एक वर्ष वाया गेलं आणि आपलं यापेक्षा चांगली कामगिरी करु शकलो असतो असा विचार करत फार ताण घेतात. फक्त एकच संधी असल्याचा विचार करत विद्यार्थी फार ताण घेत असल्याने त्यांना दोन परीक्षांचा पर्याय उपलब्ध केला जात आहे. ही परीक्षा कशाप्रकारे घ्यायची यावर सध्या विचार सुरु आहे. तसंच सेमिस्टर योजना लागू करण्याचा प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आला आहे. 


दोनदा परीक्षा देणं अनिवार्य असणार का?


मंत्रालयाने गतवर्षी ऑगस्टमध्ये जारी केलेल्या नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम रचनेत (NCF) विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा देण्याचा पर्याय दिला जावा असाही प्रस्ताव देण्यात आला होता. तसेच, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुण राखण्यासाठी परवानगी देण्यास सांगितले होते.


MoE च्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता 11, 12 च्या विद्यार्थ्यांनी दोन भाषांचा अभ्यास केला पाहिजे आणि यापैकी एक भारतीय भाषा असावी. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पीटीआयला सांगितले होते की, विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षेला बसणे बंधनकारक नाही. 


विद्यार्थ्यांना जेईईसारख्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेला वर्षातून दोनदा बसण्याचा पर्याय असेल (इयत्ता 10 आणि 12 बोर्ड). ते सर्वोत्तम गुण निवडू शकतात, परंतु ते पूर्णपणे ऐच्छिक असेल, कोणतीही सक्ती नसेल असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.