Video Karnataka Woman Beat Father In Law: वयस्कर व्यक्तीविरोधात होणारा घरगुती हिंसाचार हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा घरातील वयस्कर व्यक्तींना केली जाणाऱ्या अमानुष मारहाणीचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. सदर व्हिडीओ कर्नाटकमधील मंगळुरुमधील आहे. ही घटना 9 मार्च रोजी घडली असून तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सून तिच्या 87 वर्षीय सासऱ्याला वॉकिंग स्टीकने (चालण्याच्या काठीने) मारहाण करताना दिसत आहे.


काय आहे व्हिडीओमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमधील महिला सासऱ्यांना मारहाण करताना दिसतेय. या महिलेचं नाव उमा शंकरी असं आहे. उमा ही कर्नाटक इलेक्ट्रीसिटी बोर्डात अधिकारी म्हणून काम करते. उमाने तिचे सासरे पद्मनाभ सुवर्णा यांना काठीने मारहाण केली. सासऱ्यांच्या वॉकिंग स्टीकने त्यांना मारहाण करतानाचा उमाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उमा पदम्नाभ यांच्याशी भांडताना त्यांना मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओमधील वयस्कर व्यक्ती हात जोडून माफी मागताना आणि मारहाण न करण्याची मागणी करत आहे.


जोरात धक्का दिला अन् सासरे सोफ्याला धडकले


पद्मनाभ यांना मारहाण केली जात असताना ते सुनेला मारहाण करु नकोस असं सांगताना दिसत आहेत. मात्र उमा पद्मनाभ यांना जोरात धक्का देते. पद्मनाभ हे दरवाजाजवळ कोसळतात. पद्मनाभ हे सोफ्याला धडकून खाली पडतात. मात्र कसलाही विचार न करता उमा दरवाजा बंद करुन घेते आणि पुन्हा सासऱ्यांना काठीने मारहाण करु लागते. दरवाजा बंद केल्यानंतर सासऱ्यांना मारहाण केल्यानंतर काठी तिथेच ठेऊन उमा निघून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. सून निघून गेल्यानंतरही वयस्कर व्यक्ती दाराजवळच पडून असल्याचं व्हिडीओत दिसतंय. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा सारा प्रकार घडल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे.



गुन्हा दाखल आणि अटक


उमाने तिच्या सासऱ्यांना एवढी मारहाण का केली यासंदर्भातील कारणाचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र पद्मनाभ यांना या मारहाणीनंतर खासगी रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पद्मनाभ यांच्या लेकीने तिच्या वहिनीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर उमाला अटक करण्यात आली आहे. उमाला पुढील 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.