भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबाराला सुरुवात
भारत-पाक सीमारेषेवरील तणाव आणखी वाढण्याची शक्यता
श्रीनगर: भारतीय वायूदलाने मंगळवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी लष्कराने सीमारेषेवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सध्या पाकिस्तानकडून नौशेरा, अखनूर आणि कृष्णाघाटी या सेक्टरमध्ये गोळीबार सुरु झाला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमारेषेवरील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय वायुसेनेच्या 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यावेळी मिराज विमानांकडून तब्बल १००० किलो स्फोटके जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर डागण्यात आली. या हल्ल्यात ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आता समोर येत आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला होता.
यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत झालेल्या पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली होती. या बैठकीनंतर या हल्ल्याची सुरुवात भारताने केली असून, आता योग्य ती वेळ आणि ठिकाण पाहून उत्तर देऊ, असे उत्तर पाकिस्तानकडून देण्यात आले. या बैठकीनंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानातील जनतेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाकडून झालेला हल्ला, दहशतवादी तळांचा नायनाट आणि त्याविषयीचे सर्व दावे पाकिस्तानने फेटाळून लावले असून, भारताच्या या कृतीविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पाकिस्तानही लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराकडून सीमारेषेवरील सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात आली आहे. भारतीय वायूदलाकडून सीमारेषेवर विमानविरोधी शस्त्रास्त्रे तैनात करण्यात आली आहेत.