१६ वर्षात ७९३ चित्रपटांवर सेन्सॉरची कात्री
चित्रपट प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र न मिळालेल्या ७९३ चित्रपटांमध्ये ५८६ भारतीय चित्रपटांचा समावेश
नवी दिल्ली : सेन्सॉर बोर्डकडून (सीबीएफसी) गेल्या १६ वर्षांत ७९३ चित्रपटांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. 'आरटीआय'द्वारा आलेल्या माहितीनुसार हा खुलासा करण्यात आला आहे. १ जानेवारी २००० ते ३१ मार्च २०१६ पर्यंत सेन्सॉर बोर्डकडून ७९३ चित्रपटांना प्रदर्शित होण्यासाठीचे प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. चित्रपट प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र न मिळालेल्या ७९३ चित्रपटांमध्ये ५८६ भारतीय चित्रपट तर २०७ विदेशी चित्रपटांचा समावेश आहे.
५८६ भारतीय चित्रपटांपैकी सर्वाधिक २३१ हिंदी चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यानंतर ९६ तमिळ चित्रपट, ५३ तेलुगू चित्रपट, ३९ कन्न्ड चित्रपट, २३ मल्लाळम चित्रपट आणि १७ पंजाबी चित्रपटांना प्रदर्शित होण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले नाही. 'आरटीआय'द्वारा देण्यात आलेल्या माहितीनुसार, २०१५-१६ दरम्यान सर्वाधिक १५३ चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर २०१४-१५ या वर्षात १५२ चित्रपट, २०१३-१४ मध्ये ११९ चित्रपट आणि २०१२-१३ या वर्षात ८२ चित्रपट सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळवू शकली नाहीत.
यात अश्लिलता आणि गुन्हेविषयक असलेल्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. 'आदमखोर हसीना', 'कातिल शिकारी', 'प्यासी चांदनी', 'मधुर स्वप्नम', 'खूनी रात', 'शमशान घाट', 'मनचली पडोसन' आणि 'सेक्स विज्ञान' यांसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. या दरम्यान काही प्रसिद्द चित्रपटांवरही बंदी घालण्यात आली होती. २०१५ मध्ये आलेल्या 'मोहल्ला अस्सी' या हिंदी चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. परंतु गेल्या वर्षी 'मोहल्ला अस्सी' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.