लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. लक्षद्वीप बेटावरील एंड्रोट आणि कालपेनी बेट तसंच कावारत्ती आणि मिनिकॉय येथे इंधनाच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. एंड्रोट आणि कालपेनी बेटावर इंधन 15.3 रुपये प्रतीलिटर तसंच कावारत्ती आणि मिनिकॉय 5.2 रुपये प्रतिलिटरने स्वस्त झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर आजपासूनच लागू होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात केल्यानंतर आता लक्षद्वीपमधील सर्व बेटांवर पेट्रोलचा दर 100 रुपये 75 पैसे लीटर आणि डिझेलचा दर 95 रुपये 71 पैसे असेल. महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने नुकतीच पेट्रोल, डिझेलच्या दरात 2 रुपयांची कपात केली होती. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याआधी हा निर्णय घेण्यात आला होता. 


केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी एक्सवर पोस्ट शेअऱ करत लिहिलं होतं की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांची कपात करत पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की करोडो भारतीयांच्या आपल्या कुटुंबाचं हित आणि सुविधा यांना ते नेहमी प्राथमिकता देतात. तसंच लक्षद्वीपमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील कपातीवर म्हणाले आहेत की, नरेंद्र मोदी पहिले नेते आहेत ज्यांनी लक्षद्वीपमधील नागरिकांना आपलं कुटुंब मानलं आहे. 


पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक्सवरुन इंधन दरकपातीची माहिती दिली आहे. मंत्रालयाने म्हटलं आहे की, "लक्षद्वीपमध्ये IOCL चार बेटं कवरत्ती, मिनिकॉय, एंड्रोट आणि कलपेनी येथे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करतं. IOCL चे कवरत्ती आणि मिनिकॉय येथे डेपो आहेत. केरळच्या कोच्ची येथून IOCL डिपोमध्ये पुरवठा होतो".



इंधनदरात कपात का?


इंधनदरात मोठी कपात जाहीर करताना मंत्रालयाने सांगितलं की, अत्यल्प आणि अव्यवहार्य प्रमाणामुळे, लक्षद्वीप डेपोमध्ये भांडवली खर्च वसूल करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 6.90 रुपये समाविष्ट केले गेले. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा समावेश होता, मात्र आता वसुली पूर्ण झाल्यानंतर ती काढून टाकण्यात आली आहे. यामुळे, पेट्रोल आणि डिझेलचा आरएसपी अंदाजे 6.90 रुपये प्रति लिटरने कमी होईल, ज्यामुळे ग्राहकांना फायदा होईल.


दरम्यान नवी दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रतीलिटर आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलसाठी 104 रुपये 21 पैसे मोजावे लागत आहेत. कोलकातात पेट्रोलचा दर 103.94 रुपये आहे.