बळीराजाच्या आनंदावर विरजण! ऊसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर बंदी
केंद्र सरकारने एक मोठी घोषणा करत ऊसाच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे.
केंद्र सरकारने एक मोठी घोषणा करत ऊसाच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंबंधीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. यामुळे घरगुती बाजारपेठेतील साखरेचा तुटवडा पूर्ण होईल. सरकार बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करणाऱ्यांना रोखू शकतं. सी-हेवी इथेनॉलवर बंदी नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या (8 डिसेंबर) दिवसाअखेरीस यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
पण असं का?
पावसामुळे भारतातील ऊसाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे जगातील सर्वाधिक साखरेचं उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने 31 ऑक्टोबरपर्यंत निर्यातीवर बंदी घातली आहे. इथेनॉलची निर्मिती मर्यादित केल्यास साखरेचा साठा कमी होणार नाही.
जर इथेनॉलची निर्मिती कायम राहिली तर साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. 2023-24 मध्ये उत्पादन कमी झाल्याने आधीच चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात तर 2024-25 ची शेतीही सुरु झालेली नाही.
महाराष्ट्रात रिझर्व्ह आयरमध्ये कमी पाणी आल्याने शेतीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात 8 टक्के घट झाल्याचा अंदाज आहे. 2023-24 साठी 337 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. 30-35 लाख टन साखरेइतकाच ऊस इथेनॉलसाठी वापरला जातो.
सध्या परिस्थिती काय आहे?
साखर कंपन्यांनी इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी तेल कंपन्यांसह करार केला आहे. 1 नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या हंगामासाठी 31.7 लाख टन साखरेइतक्या इथेनॉलचा लिलाव झाला आहे. 1 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हंगामासाठी अद्याप इथेनॉलचा दर ठरलेला नाही.
सरकारकडे दोन पर्याय
सरकारकडे सध्या दोन पर्याय आहेत. ज्यामध्ये इथेनॉलचा दर कमी करणं किंवा साखर कंपन्या जास्त इथेनॉल पुरवठा करू शकणार नाहीत.
महागाईवर गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दर आठवड्याला मंत्रिगटाची बैठक घेतली जाते. हा निर्णय मंत्रिगटाच्या बैठकीतच घेतला जातो. 5 डिसेंबर रोजी मंत्री गटाच्या बैठकीत या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली आहे.
सरकारने इथेनॉलबाबतच्या धोरणात बदल केल्यास धान्यावर आधारित इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत इथेनॉलसाठी 339 कोटी रुपयांच्या ऑर्डर प्राप्त झाल्या होत्या. 4 डिसेंबर रोजी इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी ओएमसीकडून 572 कोटींची ऑर्डर मिळाली आहे.
इथेनॉल नेमकं असतं तरी काय?
इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे. इथेनॉल हा ऊसापासून तयार करण्यात येणारा एक बायप्रोडक्ट आहे. याची निर्मिती ऊसाचा रस, मका, बटाटा, कंदमुळं आणि खराब झालेल्या भाज्यांपासून केली जाते. स्टार्च आणि साखर यांचं विघटन होऊन तयार झालेलं इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून बायोफ्युअल किंवा फ्लेक्स फ्लुअल म्हणून इंधन वापरलं जातं. इथेनॉल मिसळून तयार करण्यात आलेलं फ्लेक्स फ्लुअल पेट्रोल पंपांवर पाठवलं जातं. फ्लेक्स फ्लुअलने चालणारी वाहनं ही वेगळ्या पद्धतीची असतात. या वाहनांचे इंजिन अशापद्धतीने तयार करण्यात आलेलं असतं की त्यामध्ये फ्लेक्स फ्लुअल वापरल्यास काही अडचण येत नाही.