Amit Shah on Satyapal Malik: जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir) केंद्रशासित प्रदेशाचा (Union territory ) दर्जा मिळण्याआधी शेवटचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल (Pulwama Terror Attack) काही गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. सत्यपाल मलिक यांच्या या दाव्यानंतर विरोधक सतत केंद्राला लक्ष्य करत असून टीका करत आहेत. दरम्यान सत्यपाल मलिक यांच्या या गौप्यस्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. तसंच सत्यपाल मलिक यांना मिळालेल्या सीबीआय नोटीसीवरही प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राच्या चुकांमुळेच पुलवामा हल्ला (Pulwama Attack) झाल्याचं सांगितलं असता नरेंद्र मोदींनी मला शांत राहण्यास सांगितलं असा धक्कादायक गौप्यस्फोट सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. सत्यपाल मलिक यांनी पत्रकार करण थापर यांना The Wire news पोर्टलसाठी मुलाखत दिली होती. दरम्यान अमित शाह यांना एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, आमची सोबत सोडल्यानंतरच त्यांना या सर्व गोष्टी का आठवत आहेत अशी विचारणा त्यांना केली पाहिजे. जेव्हा लोक सत्तेत असतात तेव्हा त्यांची आत्मा का जागी होत नाही? असंही ते म्हणाले आहेत. 


"पुलवामा हल्ल्यातील त्रुटी दाखवल्या असता पंतप्रधान मोदी म्हणाले तुम्ही जरा शांत राहा...", सत्यपाल मलिक यांचा गौप्यस्फोट


 


अमित शाह यांनी सत्यपाल मलिक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच जनतेने याचा विचार करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की "सत्यपाल मलिक यांचं म्हणणं खरं असेल तर राज्यपाल असताना ते शांत का होते? राज्यपाल असतानाच त्यांनी यावर बोलायला हवं होतं. हा आता सार्वजनिक चर्चेचा विषय नाही".


लपवावी लागेल अशी कोणतीही गोष्ट भाजपाने केलेली नाही. पण जर राजकीय स्वार्थासाठी कोणी आमच्यापासून वेगळं झाल्यानंतर काही बोलत असेल तर सर्वांनीच त्याचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे असंही अमित शाह यांनी सांगितलं. 


सत्यपाल मलिक यांची निवड केली तेव्हा चुकीच्या व्यक्तीची निवड करत आहोत असं वाटलं नाही का? विचारण्यात आलं असता अमित शाह यांनी सांगितलं की, ते फार काळापासून पक्षात होते. राजनाथ सिंग अध्यक्ष असताना ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. आमच्या टीमचाही भाग होते. राजकारणात असं होत असतं. पण आता जर कोणी आपला रस्ता बदलला असेल तर आपण काय बोलणार. 


सत्यपाल मलिक यांनी काय गौप्यस्फोट केला?


"सीआरपीएफ जवानांनी ताफा मोठा असल्याने जवानांना नेण्यासाठी एअरक्राफ्टची मागणी केली होती. त्यांनी यासंबंधी गृह मंत्रालयाकडे विचारणा केली होती. पण त्यांनी देण्यास नकार दिला. त्यांना फक्त पाच विमानं हवी होती. पण त्यांना एकही विमान देण्यात आलं नाही," असा गौप्यस्फोट सत्यपाल मलिक यांनी केला आहे.


पुलवामा हल्ल्याच्या आठवणी सांगताना सत्यपाल मलिक यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला उत्तराखंडच्या कॉर्बेट नॅशनल पार्कच्या बाहेरुन फोन केला होता. ते म्हणाले की "मी त्यांना त्याच संध्याकाळी ही आपली चूक असल्याच सांगितलं. जर आपण विमान दिलं असतं तर हे झालं नसतं. त्यांनी मला तुम्ही आता शांत राहा. मी याआधी काही चॅनेलला हे सांगितलं आहे. ते म्हणाले की, हे सगळं बोलू नका. ही वेगळी गोष्ट असून आम्हाला बोलू द्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही मला हे सगळं बोलू नका, तुम्ही शांत राहा असं सांगितलं. माझ्या लक्षात आलं की, हे सगळं आता पाकिस्तानच्या दिशेने जात असल्याने शांत राहण्यास सांगितलं जात आहे".