आत्मघातकी हल्ल्यासाठी गर्भवती महिलेचा होऊ शकतो वापर, आयबीची माहिती
गर्भवती महिलेच्या रुपात हिंदू किंवा बौद्ध मंदिरात ही आत्मघातकी हल्लेखोर दाखल होऊ शकते
कोलकाता : आयसीस आणि अन्य दहशतवादी संघटनांकडून पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात आत्मघाती हल्ल्याचा इशारा केंद्रीय गुप्तहेर संघटनेनं (IB) दिलाय. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा हल्ला होण्याची शक्यता आहे. बंगाल पोलिसांना हा इशारा देण्यात आलाय. विशेषतः हिंदू आणि बौद्ध मंदिरात हल्ला होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलेच्या रूपात हल्लेखोर येऊन स्फोट घडवून आणू शकतात असा इशारा देण्यात आलाय.
आयबीनं दिलेल्या सूचनेमध्ये, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जमाल उल मुजाहिद्दीन बांग्लादेश (JMB) किंवा इस्लामिक स्टेट (ISIS) आत्मघातकी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे. दहशतवादी पश्चिम बंगाल किंवा बांग्लादेशात हा हल्ला घडवून आणू शकतात, असंही यात म्हटलं गेलंय.
दहशतवादी या हल्ल्यासाठी एखाद्या महिलेची मदत घेऊ शकतात. गर्भवती महिलेच्या रुपात हिंदू किंवा बौद्ध मंदिरात ही आत्मघातकी हल्लेखोर दाखल होऊ शकते. शुक्रवारी आयबीचा अलर्ट मिळाल्यानंतर पश्चिम बंगालच्या सरकारला योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आलीय. पश्चिम बंगाल पोलिसांनी राज्यातील मोठे बौद्ध आणि हिंदू मंदिरांची एका यादी तयार करून तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची खातरजमा करण्याची तयारी सुरू केलीय. दहशतवाद्यांना कोणतीही संधी देण्यात येणार नाही, असा विश्वास पश्चिम बंगालच्या पोलिसांनी व्यक्त केलाय.
दोन आठवड्यांपूर्वी इसिसकडून मिळालेल्या एका टेलिग्राम संदेशात पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा उल्लेख आहे. श्रीलंकेनं असाच एक अलर्ट गंभीरतेनं घेतला नाही आणि इस्टरच्या दिवशी तिथं मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला, याचीही आठवण पश्चिम बंगाल पोलिसांनी करून दिलीय. श्रीलंकेच्या चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या साखळी स्फोटांमध्ये २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.