चंद्राचा शोधही काँग्रेसनेच लावला; गिरीराज सिंहांचा उपरोधिक टोला
भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय शेरेबाजी
लखनऊ: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी 'चांद्रयान-२' चे अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपण केले. यानंतर देशभरात आनंद साजरा केला जात असताना दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय शेरेबाजी होताना दिसली.
चांद्रयान-२ च्या उड्डाणानंतर लगेचच काँग्रेसकडून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळेच इस्रोची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे ट्विट करण्यात आले होते. हाच धागा पकडत भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी काँग्रेसला उपरोधिक टोला लगावला. त्यांनी काँग्रेसच्या ट्विटचा संदर्भ देताना म्हटले की, भारतीयांना सांगायला आनंद होत आहे की, चंद्राचा शोधही काँग्रेसनेच लावला होता. मात्र, काहीवेळानंतर गिरीराज सिंह यांनी हे ट्विट स्वत:हून डिलीट केले.
चांद्रयान-२ प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
तत्पूर्वी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करण्यात आला होता. चांद्रयान-२ मोहीमेला २००८ मध्ये मनमोहन सिंग यांनीच मान्यता दिल्याचे काँग्रेसने म्हटले होते.
दरम्यान, चांद्रयान ४८ दिवसांनंतर म्हणजे ६-७ सप्टेंबरदरम्यान चंद्रावर उतरेल. हा प्रयत्न यशस्वी ठरल्यास भारत चंद्रावर यान उतरवणारा जगातील चौथा देश ठरेल.