चांद्रयान-२ मोहीम : `इस्त्रो`च्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांवर देशाला अभिमान - पंतप्रधान
भारताची बहुप्रतीक्षीत आणि महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-२.
श्रीहरीकोटा : भारताची बहुप्रतीक्षीत आणि महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान-२चे विक्रम लँडर चंद्रावर अलगद उतरण्यात अपयशी ठरले. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ २.१ किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे या मोहिमेला यश आले नाही. विक्रम लँडर हे चंद्रावर उतरणे हा या मोहिमेतला एक भाग होता. मात्र हे लँडर चंद्रापर्यंत पोहोचणे हेदेखील मोठे यश मानले जाते आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञाचे तोंडभरून कौतुक केलं. संपूर्ण देश इस्त्रोच्या पाठीशी असून त्यांच्या प्रयत्नांवर देशाला अभिमान असल्याचे सांगत मोदींनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
चांद्रयान-२ हे यान २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला आहे. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. मात्र, असे झाले तरी संपर्क ठेवणे सुरुच राहणार आहे, असे इस्त्रोकडून सांगण्यात आले.
चंद्रावर विक्रम लॅंड होणार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही श्रीहरिकोटा येथे खास उपस्थित होते. ते शास्त्रज्ञांना धीर देत होते. तुमच्या या कामगिरीचा देशाला अभिमान आहे, असे सांगून शास्त्रज्ञांचे कौतुक केले. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करत वैज्ञनिकांचं मनोधर्य वाढवले आहे. आम्हाला आमच्या वैज्ञनिकांचा अभिमान, त्यांनी इतिहास रचला, असे ट्विट केले आहे.