चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं? तुम्हीही घ्या अनुभव, ISRO ने शेअर केली 3D इमेज
Vikram Lander 3D Image : गेल्या 12 दिवसात चांद्रयान-3 मोहिमेमध्ये तीन प्रमुख उद्दिष्टे पार केली आहेत. त्यामुळे चांद्रयान-3 यशस्वी झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच इस्त्रोने एक फोटो शेअर केला आहे.
Moon 3D Image : भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'सॉफ्ट लँडिंग' केली अन् मोठा इतिहास रचला. 23 ऑक्टोबरला चांद्रयान-3 लँड झाल्यानंतर आता गेल्या 12 दिवसात विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशातच आता लँडरला 'स्लीपमोड'मध्ये ठेवण्यात आल्याचं भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (ISRO) सोमवारी जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या 12 दिवसात चांद्रयान-3 मोहिमेमध्ये तीन प्रमुख उद्दिष्टे पार केली आहेत. त्यामुळे चांद्रयान-3 यशस्वी झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
विक्रम लँडरने मूळ स्थान बदलून नवीन जागेवरून पुन्हा वैज्ञानिक नोंदी घेतल्या आणि भविष्यातील मोहिमांची चाचपणी देखील केली आहे. चंद्रावरील नैसर्गिक हादऱ्याची नोंद देखील चांद्रयानाने घेतली आहे. तसेच तापमानाची नोंद देखील घेण्यात आली आहे. चांद्रयान-3 मोहिमेची नोंद इस्त्रो नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे. अशातच आता तुम्हालाही चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं याची झलक पाहता येणार आहे. इस्त्रोने नुकताच एक फोटो शेअर केलाय. इस्रोने शेअर केलेल्या फोटोत विक्रम लँडरसह चंद्राच्या पृष्ठभागावर लाल, हिरवा आणि निळा काहीतरी दिसतंय. हे नक्की काय आहे? याची माहिची त्यांनी दिलीये.
चंद्राच्या पृष्ठभागावर लाल, निळं असं काही नाहीये. या फोटोमागे एक वेगळीच गोष्ट आहे. इस्त्रोने शेअर केलेला फोटो (Vikram Lander 3D Image) हा थ्री डी इमेज आहे. एनाग्लिफ स्टीरियो किंवा मल्टी-व्यू इमेज असं त्याला म्हटलं जातं. अनेक फोटो एकत्र करून हा फोटो तयार करण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्हाला थ्री डी फोटो पाहता येईल. Anaglyph NavCam स्टिरीओ फोटोचा वापरून देखील तयार केली गेली आहे, ज्यामध्ये प्रज्ञान रोव्हरवर घेतलेल्या डाव्या आणि उजव्या प्रतिमांचा समावेश आहे.
3D फोटो कसा बघायचा?
तुम्हाला हे चित्र फक्त 3D दृश्यात पहायचं असेल तर लाल किंवा निळसर चष्मा वापरा. फोटो NavCam LEOS/ISRO ने विकसित केले आहे. यावरून प्राप्त झालेल्या डेटावर देखील SAC/ISRO द्वारे प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हा फोटो तयार होतो.