Chandrayaan 3 Rover Video : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं चंद्रावर पाठवण्यात आलेल्या चांद्रयान 3 नं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राचा दक्षिण ध्रुव गाठला. त्या क्षणापासून चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरनं त्यांची कामं सुरु केली. त्यातच आता एक नवा व्हिडीओ इस्रोनं जारी केला आहे. जिथं चंद्रारवर सल्फर असण्यासंदर्भातील आणखी एक चाचणी पार पडली असून, त्यातून समोर आलेली माहिती जाहीर करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी इस्रोनं X च्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. कारण, इथं सल्फरचे साठे असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यावेळी एक वेगळं तंत्र वापरण्यात आलं. इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार रोवरवर असणाऱ्या आणखी एका उपकरणाच्या माध्यमातून इथं सल्फरचे साठे असल्याचं निश्चित झालं आहे. या सविस्तर तपशीलासाठी इस्रोनं अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोस्कोप (APXS) चा वापर करण्यात आला ज्यातून काही इतरही घटक हेरले गेले. 


 



इस्रोनं शेअर केला आणखी एक व्हिडीओ.... 


इस्रोनं प्रज्ञान रोवरचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला. जिथं प्रज्ञान रोवर त्याची वाट शोधताना चंद्रावर कसा वावरतोय याबाबतचं दृश्य पाहायला मिळत आहे. लँडर कॅमेरातून ही दृश्य टीपण्यात आली आहेत. 'असं वाटतंय की चंदोमामाच्या अंगणात लहान मुल बागडतंय आणि त्याची आई त्याच्याकडे कौतुकानं पाहतेय.... नाही का?' असं सुरेख कॅप्शनही इस्रोनं या व्हिडीओला दिलं. 



लँडरचाही फोटो टीपला... 


रोवरची किमया जगापुढं आणण्याआधी इस्रोनं चंद्रावरील विक्रम लँडरचा फोटोही शेअर केला होता. या फोटोला 'स्माईल प्लीज' असं कॅप्शन देण्यात आलं होतं. नॅव्हिगेशन कॅमेरातून हा फोटो टीपण्यात आला होता. सोशल मीडियावर हे सर्व फोटो शेअर करताक्षणीच कमालीचे व्हायरल झाले. दरम्यान एकिकडे इस्रोच्या चांद्रयान मोहिमेला टप्प्याटप्प्यानं यश मिळत असतानाच दुसरीकडे आता इस्रो सूर्य मोहिमेसाठी सज्ज होताना दिसत आहे. शनिवारी या मोहिमेअंतर्गत इस्रोचं आदित्य एल1 यान अवकाशात झेपावणार आहे. त्यामुळं या मोहिमेवरही सर्वांच्याच नजरा असतील.