Chandrayaan 3 पृथ्वीच्या दिशेनं परततंय; इस्रोनं Photo शेअर करत दिली मोठी अपडेट
Chandrayaan-3 Update: इस्रोकडून अतिशय मोठी मोहिम हाती घेत जुलै महिन्यात चांद्रयान 3 चंद्राकडे पाठवलं. ज्यानंतर चंद्रासंदर्भातील बरीच माहिती जगासमोर आली.
Chandrayaan-3 Update: इस्रोची (ISRO) अतिशय मोठी आणि महत्त्वाकांक्षी अशी चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ठरल्यामुळं जागतिक अवकाश क्षेत्रामध्ये भारताचं नाव उंचावलं. चांद्रयानासोबत चंद्राच्या पृष्ठावर उतरलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरच्या माध्यमातून चंद्रावरील जमीन, तेथील एकंदर स्थिती आणि अनेक गोष्टींचा उलगडा झाला आणि पाहता पाहता चंद्रावरील दृश्य इथं पृथ्वीवर बसून सर्वांनाच अगदी सहजपणे पाहता आली. आता याच चांद्रयान मोहिमेसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट बऱ्याच काळानंतर इस्रोनं दिली आणि अनेकांच्याच नजरा वळल्या.
अधिकृत X अकाऊंटवरून माहिती देत इस्रोनं चांद्रयानाचं प्रोपल्शन मॉड्यूल आता परतीच्या प्रवासाला लागल्याचं या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलं. एका अतिशय वेगळ्या प्रयोगामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल ल्युनार ऑर्बिटमधून म्हणजेच चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणलं गेलं आहे असं इस्रोनं सांगत या प्रयोगाची छायाचित्र प्रसिद्ध केली.
हेसुद्धा वाचा : मुंबई दुबईच्या वाटेवर! 8500 कोटी रुपये खर्च करून BMC चं मेगाप्लॅनवर काम सुरु
इस्रोकडून या प्रोपल्शन मॉड्यूलच्या परतीच्या प्रवासाठी मॅन्यूवर करण्यात आलं आणि त्यानंतर 10 नोव्हेंबरपासून त्यानं चंद्राच्या कक्षेतून परतण्या सुरुवात केली. 22 नोव्हेंबरला हे मॉड्यूल पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असणाऱ्या पेरिगी बिंदूपासून पुढे गेलं. चंद्रावरून काही चाचणी नमुने परत आणण्याच्या अर्थात 'सँपल रिटर्न मिशन'ला केंद्रस्थानी ठेवत इस्रोनं हा प्रयोग केला. परिणामी चंद्राच्या 150 किमी कक्षेमध्ये घिरट्या घालणारं हे मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत असल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं.
पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा हे मॉज्यूल 13 दिवसांमध्ये पूर्ण करत असून, पृथ्वीपासून किमान 1.15 लाख किमीपर्यंत ते पोहोचणार आहे. दरम्यान, हे मॉड्यूल सध्यातरी कोणत्याही उपग्रहावर आदळण्याचा धोका नसल्याचंही स्पष्ट करण्यात येत आहे.
चांद्रयान 3 मोहिमेनंतर आता इस्रोनं गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं आहे. दरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवापाशी सॉफ्ट लँडिंग करणं हा चांद्रयान 3 मोहिमेमागचा मुख्य हेतू होता असंही यावेळी भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं. 23 ऑगस्ट 2023 रोजी या मोहिमेला यश मिळालं असून, तेव्हापासून पुढील 14 दिवस (पृथ्वीवरील 14 तर चंद्रावरील एक दिवस) विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरनं चंद्रावर भ्रमण करत बरीच माहिती इस्रोपर्यंत पाठवली होती.