नवी दिल्ली - आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी अनेकवेळा दोन पक्षकार चेकचा वापर करतात. मोठमोठ्या आकड्यांचे व्यवहार करतानाही चेकचाच वापर केला जातो. पण चेक बाऊन्स होऊ नये. म्हणजेच बॅंकेत न वटता परत येऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक असते. तुम्ही दुसऱ्याला दिलेला चेक बाऊन्स झाला तर त्याचा आर्थिक फटका तुम्हाला बसतोच. पण मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे कोणालाही चेक देण्यापूर्वीच वेगवेगळ्या गोष्टींची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणालाही पैसे देण्यासाठी किंवा कोणाकडूनही पैसे स्वीकारण्यासाठी आता विविध पर्याय उपलब्ध आहेत. चेकशिवायही व्यवहार पूर्ण करता येतो. सरकारही डिजिटल पद्धतीने पैसे देण्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी विविध वेबसाईट्स, अॅप्सही बाजारात उपलब्ध आहेत. हातातील मोबाईलच्या साह्यानेही एखाद्याच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवता येतात. पण तरीही काही जणांकडून पैसे देण्यासाठी चेकचाच वापर केला जातो. तर काहीजण आजही रोख स्वरुपातच पैशांची देवाण-घेवाण करत असतात. एखाद्याच्या अकाऊंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविण्यापेक्षा त्याला चेक देणे काही जणांना जास्त सोपे आणि  सुरक्षित वाटते. त्यामुळेच चेक बाऊन्स होण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याची पाहायला मिळते. 


कोणालाही दिलेला चेक जर कोणत्याही कारणामुळे वटला नाही म्हणजेच तो बाऊन्स झाला. तर समोरची व्यक्ती तुमच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट अॅक्ट १८८१ नुसार कायदेशीर कारवाई करू शकते. ज्यामध्ये दोष सिद्ध झाल्यास चेक देणाऱ्याला तुरुंगाची हवाही खावी लागू शकते. त्यामुळे कोणालाही चेक देताना खालील गोष्टींची आवर्जून पडताळणी करा.
चेकवर केलेली स्वाक्षरी बॅंकेतील खात्याप्रमाणेच केलेली आहे ना, याची खात्री करा.


खराब झालेले किंवा जीर्ण झालेले चेक वापरू नका


खात्यामध्ये पुरेशी शिल्लक आहे ना, याची चेक देण्यापूर्वी खात्री करा


चेकवर पेनाने कोणतेही अक्षर किंवा स्वाक्षरी गिरवू नका


चेकवर आकड्यांत लिहिलेली रक्कम आणि अक्षरांत लिहिलेली रक्कम एकच आहे ना, याची खात्री करा


चेकवर लिहिलेला दिनांक बरोबर आहे ना, याची खात्री करा


चेकवर लिहिलेला अकाऊंट नंबर आपलाच आहे ना, याची खात्री करा


कंपनीचा चेक असेल, तर त्यावर अधिकृत व्यक्तींनीच स्वाक्षरी केली आहे ना, हे बघून घ्या. त्याचबरोबर त्यावर शिक्का किंवा कंपनीचे नाव आहे ना, हे बघून घ्या.


चेक दिल्यावर तो वटवू नका, असे देणाऱ्याने संबंधित बॅंकेला सांगितले असेल, तरीही चेक बाऊन्स होऊ शकतो. 


चेक बाऊन्स झाल्यावर व्यावसायिक बॅंकांकडून वेगवेगळ्या प्रमाणे दंड आकारला जातो. काही व्यावसायिक बॅंका १०० रुपये ते ७५० रुपयांपर्यंत दंड आकारतात. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका १०० रुपये ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारतात.