Cheque Bounce Rules: चेक बाऊन्स रोखण्यासाठी नवीन नियम येणार, जाणून घ्या
चेक बाऊन्ससाठी येणार नवीन नियम, कोर्टातही जाता येणार?
मुंबई : आपण अनेकदा बँकेत चेकने व्यवहार करतो. कधी तो सॅलरीचा असतो, तर कधी इतर लोकांनी आपल्याला देऊ केलेला असतो. मात्र चेक देणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसेच नसल्यामुळे तो बाऊन्स होतो. त्यामुळे आपल्याला आर्थिक आणि मानसिक धक्का बसतो. अनेक प्रकरणात अशाच घटना घडतात.या घटना रोखण्यासाठी आता चेक बाऊन्स रोखण्यासाठी नवीन नियम येणार आहे.हा नियम काय असणार आहे, तो जाणून घेऊय़ात.
चेक बाऊन्सची वाढती प्रकरणे पाहता मंत्रालयात नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. ज्यामध्ये अशी प्रकरणे रोखण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर चर्चा झाली. यामध्ये चेक बाऊन्स प्रकरणांना अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी, वित्त मंत्रालय इतर खात्यांमधून पैसे कापून घेणे आणि नवीन खाती उघडण्यास प्रतिबंध करणे यासारख्या अनेक नियमांवर विचार करत आहे.
पीटीआय दिलेल्या माहितीनुसार, इतर सूचनांमध्ये चेक बाऊन्सचे प्रकरण कर्ज डिफॉल्ट म्हणून हाताळणे, क्रेडिट कंपन्यांना अहवाल देणे समाविष्ट आहे. जेणेकरून त्या व्यक्तीचा गुण कमी करता येतील. या सूचना स्वीकारण्यापूर्वी कायदेशीर मत घेतली जाणार आहे. दरम्यान जर या सूचनांची अंमलबजावणी झाल्यास पैसे देणाऱ्याला धनादेश द्यायला भाग पाडले जाईल आणि हे प्रकरण न्यायालयात नेण्याची गरज भासणार नाही. यामुळे व्यवसाय करणे सुलभ होईल आणि खात्यात पुरेसे पैसे नसतानाही जाणीवपूर्वक धनादेश जारी करण्याची प्रथा बंद होईल.
कोर्टात जाता येणार
चेक देणाऱ्यांच्या इतर खात्यातून रक्कम आपोआप वजा करण्यासाठी मानक कार्यप्रणाली आणि इतर सूचनांचे पालन करावे लागेल. चेक बाऊन्स झाल्याची केस कोर्टात दाखल केली जाऊ शकते आणि हा दंडनीय गुन्हा आहे, जो चेकच्या दुप्पट रक्कम किंवा दोन वर्षाचा कारावास भोगावा लागू शकतो.
दरम्यान चेक बाऊन्स रोखण्यासाठी वरील सर्व गोष्टींचा विचार सुरु आहे. लवकरच चेक बाऊन्स रोखण्यासाठी नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे.