मुंबई: वर्ध्याच्या हिंगणघाट येथे तरुणीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याच्या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळे याला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी अनेकजण करत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी छत्रपती संभाजीराजे यांनीही या घटनेबद्दल तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. इतकेच नव्हे तर जनभावनेचा दाखला देत महाराष्ट्र पोलिसांनी आता हैदराबाद पोलिसांचा आदर्श घ्यावा, असा सल्लाही संभाजीराजे यांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीराजे यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज जर महाराज असते, तर ह्या असल्या नराधमाला कोणती शिक्षा केली असती? हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांना ते समजून जाईल. सध्याची जनभावना पाहता महाराष्ट्र पोलीसांनी हैद्राबाद पोलीसांचा आदर्श घेण्याची वेळ आल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले. 


हिंगणघाट शिक्षिका जळीत कांड : आरोपीच्या घरची मंडळी म्हणतात...


काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील चार आरोपींचे तात्काळ पोलीस एन्काऊंटर करण्यात आले होते. अनेकांनी हैदराबाद पोलिसांच्या या कृतीचे कौतुक केले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रातही हेच करण्याची वेळ आल्याचे संभाजीराजे यांनी सूचित केले आहे. 




अशाप्रकारच्या कारवाईशिवाय नराधमांना वचक बसणार नाही. भविष्यात कुणा माता भगिनी कडे वाईट नजरेने बघण्याचे धाडसच काय, विचारही मनात आला नाही पाहिजे. त्यासाठी असे काही करण्याची गरज आहे. निर्भया असेल किंवा कोपर्डीच्या भगिनीला आजसुद्धा न्याय मिळलेला नाही, अशी खंत संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.