`सारखी रिल्स बघू नको` पती ओरडल्याचा आला राग...दरवाजा बंद करुन बायकोने उचलंल टोकाचं पाऊल
Wife Sucide: छत्तीसगडमधील भिलाई येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. रचना साहू असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे.
Wife Sucide: नवरा बायकोमधील नेहमीच भांडण ही तशी साधारण गोष्ट वाटते. पण या भांडणाला दोघातला कोणी कसं, कधी गांभीर्याने घेईल? हे सांगता येत नाही. हल्ली मोबाईल, सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय. पण हेच एका महिलेच्या आत्महत्येचं निमित्त ठरलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
छत्तीसगडमधील भिलाई येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. रचना साहू असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर भूपेंद्र साहू असे पतीचे नाव आहे. यामागे कोणतंही मोठं कारण असेल असे एखाद्याला वाटेल. पण इन्स्टाग्राम रिल्समुळे ही आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येत होते. सारख्या रिल्स बघू नकोस म्हणत पती भूपेंद्र रागावला. त्याने पत्नी रचनाचा मोबाईल हिसकावून घेतला. याचा राग रचना मनात घेऊन बसली. संताप अनावर झाल्याने तिने थेट टोकाचे पाऊल उचलले.
रचना साहू रील्स बनवून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अपलोड करायची. तिचा दिवसातला बराच वेळ रील पाहण्यात आणि बनवण्यात जायचा, असे शेजारचे सांगतात. दरम्यान रचनाच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तक्रार झाली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
या दाम्पत्याचे 6 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हे दोघे सुपेला येथे राहायचे. भूपेंद्र साहू यांची पत्नी रचना साहूनेने शुक्रवारी सायंकाळी तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांनाही एक मुलगी आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.
बायको नेहमी बनवायची रील
समोर आलेल्या माहितीनुसार, रचना साहूला रील्स बनवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करायची सवय लागली होती.. तिचा बराचसा वेळ याच कामात जात असे. घरच्या कामात तिचे लक्ष नव्हते. पती भूपेंद्र साहू हे फरशा बसवण्याचे काम करतात. पती नेहमी तिला घरच्या कामात लक्ष दे म्हणून टोकत असे. पण ती वारंवार याकडे दुर्लक्ष करत असे.
शुक्रवारी जेव्हा पती घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी रचना साहू रील्स पाहत होती. त्यामुळे भूपेंद्र तिला शिवीगाळ करून रील पाहण्यास मनाई करु लागला. तसेच मोबाईल हिसकावून तो घराबाहेर गेला. यामुळे पत्नी संतापली. तिने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला दुसऱ्या खोलीत बंद केले. त्यानंतर पुन्हा खोलीत येऊन तिने स्वत:ला गळफास लावून घेतला.
मुलीच्या रडण्याचा आवाज रचनाच्या सासू-सासऱ्यांना ऐकू आला. नात का रडते पाहायला आजी आजोबा वरच्या खोलीत गेले. तिथे नात एकटीच रडत होती. सुन कुठे गेली म्हणून पाहायला ते दुसऱ्या खोलीत गेले. तर दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांनी पाहिले. सासु सासऱ्यांनी आजुबाजूच्या लोकांना कळवले. त्यांनी पतीला याची माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडला आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. रचनाने गळफास लावून घेतल्याचे त्यांनी पाहिले. ही माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.