छत्तीसगड निवडणूक : ७२ जागांसाठी मतदान सुरू, EVM बिघडलं
रायपूर दक्षिणमधले दोन ईव्हीएम मशीन खराब असल्याचं उघड
रायपूर : छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. या टप्प्यात अनेक विद्यमान मंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विरोधीपक्ष नेते यांच्यासह भाजपाचे प्रमुख विरोधक अजित जोगी यांच्या पक्षाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या टप्प्यातल्या ७२ जागांपैकी ४२ जागा भाजपानं जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या खात्यात २७ जागा आल्या होत्या. आज सकाळी आठ ते पाच दरम्यान मतदान होणार आहे.
सकाळी आठ वाजता सुरू झालेलं मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील. मतदानाला सुरुवात होताच रायपूर दक्षिणमधले दोन ईव्हीएम मशीन खराब असल्याचं समोर आलं. त्यामुळे बुथ क्रमांक १२६ आणि १२७ चं मतदान थांबवण्यात आलं. यामुळे रखडलेल्या मतदारांनी एकच गोंधळ घातला.
दुसरीकडे, बिंद्रानवागढ विधानसबेच्या दोन बुथवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू आहे. इथं दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान पार पडेल.
नक्षलग्रस्त भागात गरियाबंद, धमतरी, महासमुंद, कबीरधाम, जशपूर आणि बलरामपूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय.
पहिल्या टप्प्यात राज्यातील आठ नक्षलग्रस्त जिह्यातील १८ जागांलवर १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं.