अपघातानंतर चालक रक्तबंबाळ असताना लोकांची कोंबड्या पळवून नेण्यासाठी झुंबड; पाहा मन विषष्ण करणारा VIDEO
आग्रा येथील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री 16 वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातात एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. दरम्यान अपघातानंतर काही लोक मदत करण्याऐवजी कोंबड्या घेऊन पळून जात असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. दृश्यमानता कमी असल्याने मंगळवारी रात्री 16 वाहनं एकमेकांवर आदळली. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातानंतर काही लोक मदत करण्याऐवजी कोंबड्या घेऊन पळून जात असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे.
वाहनांच्या धडकेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. तसंच दुर्घटनाग्रस्त वाहनांना बाजूला करण्यात आलं असून, वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
धुक्यामुळे अपघात
दाट धुकं असल्याने राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री वाहनांचा वेग कमी झाला होता. दृश्यमानता कमी असल्याने अनेक चालकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या शेजारी उभ्या केल्या होत्या. आग्रा येथून फिरोजाबादला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शाहदरा फ्लायओव्हर आणि झरना नाल्याच्या दरम्यान एकामागोमाग एक चार ट्रक, दोन बस, एक ऑटोसहित 16 वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातात ट्रकचालक उमेशचंद्र यादव याचा मृत्यू झाला. तसंच 6 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
लोकांनी कोंबड्या चोरुन काढला पळ
धुक्यामुळे दुर्घटनाग्रस्त झालेल्या गाड्यांमध्ये मॅक्स गाडीचाही समावेश होता. या गाडीतून कोंबड्यांची वाहतूक केली जात होती. गाडीचा अपघात झालेला असताना लोक चालकाची मदत करण्याऐवजी त्यातील कोंबड्या चोरी करुन पळ काढत होते. ज्याच्या हाताला जितक्या कोंबड्या लागल्या तितक्या चोरुन तो पळून गेला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक या कोबंड्यांची आग्रा येथून खरेदी केल्यानंतर आपल्या गावी निघाला होता. याचवेळी रस्त्यात अपघात झाला. लोकांनी जवळपास 1.5 लाखांच्या कोंबड्या चोरल्या. पोलिसांनी ही अपघातग्रस्त गाडी रस्त्याच्या शेजारी उभी केली होती. लोकांनी गाडीच्या आत कोंबड्या असल्याचं पाहिल्यानंतर त्या चोरण्यास सुरुवात केली. चालकाने लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्याचं ऐकलं नाही.
अपघातानंतर चालक जखमी असताना लोकांनी त्याला मदत करण्याऐवजी कोंबड्या चोरल्याने नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरु होता. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर लोक पळून गेले.