नवी दिल्ली : भारताविरुद्ध चीननं पुन्हा एकदा मनमानी पद्धत सुरू केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, चीननं तिबेटहून भारतात वाहत येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखलंय. यामुळे अरुणाचल प्रदेशचा जास्तीत जास्त भाग कोरडा पडण्याचा धोका निर्माण झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार निनोंग एरिंग यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे अरुणाचलच्या तूतिंग, यिंगकियोंग आणि पासीघाट हा भाग कोरडा पडण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केलीय. 


निनोंग एरिंग यांच्या म्हणण्यानुसार, चीननं तिबेटमध्ये वाहणाऱ्या यारलुंग सांगपो नदीचं पाणी रोखलंय. ही नदी वाहत वाहत जेव्हा अरुणाचलमध्ये प्रवेश करते तेव्हा या नदीला 'सियांग' नावानं ओळखलं जातं. ही नदी पुढे आसामशी जोडली जाते... इथे तिला ब्रह्मपुत्रा नदीच्या नावानं ओळखलं जातं. 


चीनच्या जल संसाधन मंत्रालयानं या बातम्यांना नकार दिलाय. १६ ते १७ ऑक्टोबर दरम्यान नदीच्या मिलिल सेक्शनमध्ये भूस्खलन झाल्यानं नदीचं पाणी प्रभावित झालंय... आणि त्यामुळेच, अरुणाचल प्रदेशात पाण्याचा वेग कमी झालाय. 


दुसरीकडे, अरुणाचलच्या पश्चिमी सियांग प्रांतातील अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जाहीर केलीय. नदीक्षेत्रापासून दूर राहा तसंच मासेमारी करताना सावधानता बाळगा, असं त्यात म्हटलं गेलंय. कारण चीननं अचानक पाणी सोडलं तर या प्रदेशात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.