`अरुणालच प्रदेश आमचाच, भारत आणि चीनदरम्यान...`; चीनचा पुन्हा एकदा `हस्यास्पद` दावा
China Claims On Arunachal Pradesh: चीनने अरुणालच प्रदेश आमचाच भूभाग असल्याचा दावा करण्याची ही मार्च महिन्यातील चौथी वेळ आहे. देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचा दावा फेटाळून लावल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा चीनने यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.
China Claims On Arunachal Pradesh: चीनने सोमवारी पुन्हा एकदा भारताचा अविभाज्य भाग असलेल्या ईशान्येकडील अरुणचल प्रदेशवर दावा सांगितला आहे. अरुणाचल प्रदेश हा आमचाच भूभाग असल्याचं चीनने म्हटलं आहे. मात्र बीजिंगकडून केला जाणारा हा दावा 'बिनबुडाचा' आणि 'हस्यास्पद' असल्याचं सांगत भारताने तो फेटाळून लावला आहे. सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या प्रतिक्रियेवर मत नोंदवताना अरुणाचलवर पुन्हा दावा सांगितला. भारताच्या ईशान्येकडे असलेलं हे सीमावर्ती राज्य ‘भारताचा नैसर्गिक भाग’ असल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी ठासून सांगितलं होतं. त्यानंतरही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जिआन यांनी या भूभागावर चीनच्या दाव्याचा पुनरुच्चार केल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये सीमेसंदर्भात एकमत नाही
जयशंकर यांनी सिंगापूरमधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशियन स्टडीज (आयएसएएस) एका व्याख्यानात अरुणाचल प्रदेशसंदर्भात भाष्य केलं. जयशंकर यांना अरुणाचलसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर, "हा काही नवा मुद्दा नाही. चीनने या प्रदेशावर दावा सांगितला आहे आणि ते पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख करत आहे. सुरुवातीला हे दावे बिनबुडाचे होते आणि आजही ते बिनबुडाचेच आहेत," असं स्पष्टपणे सांगितलं होतं. "माझ्यामते आमची यावर फार स्पष्ट भूमिका आहे. आमची भूमिका कायम सारखीच राहिली आहे," असंही जयशंकर म्हणाले होते. जयशंकर यांच्या याच विधानावर सरकारी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लिन यांनी भारत आणि चीनमध्ये समेसंदर्भातील मुद्द्यांवर कधीच एकमत झालेलं नाही, असं सांगितलं.
म्हणे बेकायदेशीररित्या ताबा मिळवलेला भाग
लिन यांनी केलेल्या दाव्यानुसार जंगनान (अरुणाचल प्रदेशला चीनने दिलेलं नाव) भारताने 'बेकायदेशीररित्या ताबा' मिळवलेला भाग असून पूर्वी तो चीनचा भाग होता. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अरुणाचल प्रदेशाचं श्रेत्रावर कायमच चीनचं 'प्रभावी प्रशासन' राहिलं आहे असाही दावा केला. भारताने 1987 मध्ये बेकायदेशीररित्या ताबा मिळवलेल्या श्रेत्रावर 'कथित अरुणालच प्रदेश'ची स्थापना केली, असा दावाही केला आहे. एका महिन्यात चीनने चौथ्यांदा अरुणाचल प्रदेशवर आपला हक्क सांगितला आहे. ‘भारताच्या कारवायांबाबत आम्ही अनेकदा कठोर शब्दांमध्ये वक्तव्ये जारी केली आहेत. त्यांच्या कृती अप्रभावी असल्याचेही आम्ही अनेकदा सांगितले आहे. चीनची ही भूमिका कधीही बदललेली नाही’, असे लिन यांनी प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं.