नवी दिल्ली: भारताच्या एअरस्ट्राईकला प्रत्युत्तर देण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय हद्दीत शिरलेले पाकिस्तानचे एफ-१६ विमान भारतीय वायूदलाने पाडले होते. यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी अतुलनीय शौर्य दाखवत मिग-२१ बायसन या तुलनेने जुन्या विमानाच्या साहाय्याने अद्यायावत समजल्या जाणाऱ्या अमेरिकन बनावटीच्या एफ-१६ विमानाला धूळ चारली होती. या नादात अभिनंदन यांचे मिग-२१ विमानही पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन कोसळले होते. मात्र, मिग-२१ विमानाकडून एफ-१६ चा पराभव होणे, ही बाब पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे पाकिस्तानी वायूदलाच्या ताफ्यातील जेएफ-१७ या लढाऊ विमानांची क्षमता वाढवण्याच्या (अपग्रेडेशन) कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी चीन पाकिस्तानला मदत करत आहे. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या एफ-१६ या विमानाबरोबरच जेएफ-१७ विमानांनीही भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय विमानांच्या चोख प्रत्युत्तरानंतर या सर्व विमानांनी पळ काढला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपयशामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाल्याने त्यांच्याकडून जेएफ-१७ विमानांचे अपग्रेडेशन करण्यात येत आहे. चीनमधील ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, जेएफ-१७ विमानांच्या अपग्रेडेड व्हर्जन्सची सध्या निर्मिती सुरु आहे. भारतीय बनावटीच्या तेजस या विमानाला प्रत्युत्तर देण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हे काम सुरु आहे. तेजसप्रमाणे जेएफ-१७ विमानेही सिंगल इंजिन, मल्टीरोल आणि वजनाला हलकी आहेत. मात्र, भारतीय वायूदलाच्या चोख प्रत्युत्तरानंतर जेएफ-१७ ची क्षमता आणखी वाढवली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने संदेशवहन यंत्रणा आणि मारक क्षमता वाढवण्याचा समावेश आहे. याशिवाय, जेएफ-१७ मध्ये इलेक्ट्रॉनिक स्कॅन रडार लावण्यात येईल. जेणेकरून युद्धाच्यावेळी वैमानिकाला अधिकाअधिक माहिती मिळेल व एकापेक्षा जास्त लक्ष्यांचा भेद करणे सोपे जाईल. 


दुसरीकडे भारतानेही तेजस विमानांच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. २०१९ च्या अखेरपर्यंत १६ तेजस विमाने वायूदलाच्या ताफ्यात सामील होतील. हिंदुस्थान एनरॉटिक्स लिमिटेकडून या विमानांची निर्मिती केली जात आहे. मिग-२१ विमानांना पर्याय म्हणून ही तेजसची निर्मिती करण्यात आली आहे.